पुणे – लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनलवरून होणारी सर्व उड्डाणे आता नव्या टर्मिनलवरून होणार असून, आज (मंगळवार) पासून ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. उड्डाणांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा आढावा मंत्री मोहोळ यांनी विमानतळाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला.
पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले असून, या टर्मिनलवरून होणाऱ्या उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली आहे. मात्र, इमिग्रेशनच्या यंत्रणेबाबतची निर्माणाधिन प्रक्रिया आता पूर्णत्वास गेली आहे. मंत्री मोहोळ यांनी या सर्व प्रक्रियेचा आढावा घेतला आणि तांत्रिक बाबींसंदर्भात माहितीही घेतली.
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, की पुणे विमानतळावरून आताच्या घडीला एकूण ३ मार्गांवरून ५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू आहेत. ही सर्व उड्डाणे नव्या टर्मिनलकडे स्थलांतरित करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी पुणेकर प्रवाशांसाठी आजवर जुनेच टर्मिनल वापरले जात होते, ज्यावर अद्ययावत सुविधांचा अभाव होता. आता मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरुवात सुखकर होणार आहे.
इमिग्रेशन संदर्भातील तांत्रिक प्रक्रिया पूर्णत्वास नेऊन नवे टर्मिनल आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुणे विमानतळाच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून, अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याची मालिका अशीच अखंडित राहील, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.