पुणे – पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनच्या वतीने 4 ते 11 मार्चदरम्यान होणाऱ्या 19 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (पिफ) नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यंदा चित्रपटगृहाबरोबरच ऑनलाईनच्या माध्यमातून देखील महोत्सव होणार असून, या दोन्हींसाठीची नोंदणी प्रक्रिया वेगळी आहे.
यंदा सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर, लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि कॅम्प परिसरातील आयनॉक्स या ठिकाणी चित्रपट दाखविले जाणार आहेत. मंगळवारपासून (16 फेब्रुवारी) www.piffindia.com या संकेतस्थळावर महोत्सवाचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि गुरुवारपासून (25 फेब्रुवारी) चित्रपटप्रेमींना स्पॉट रजिस्ट्रेशन करता येणार आहे.
ऑनलाइन नोंदणीचे शुल्क हे सर्वांसाठी 500 रुपये असून, यात निवडक 26 चित्रपट दाखविले जाणार आहेत. तर, चित्रपटगृहांसाठी नोंदणी शुल्क हे सर्वांसाठी 600 रुपये असून, यात सुमारे 150 चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. यासाठी मर्यादित जागा उपलब्ध असून या संदर्भातील नियम आणि अटी “पिफ’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या आहेत.