पुणे – पुण्यातील खड्डयांमुळे वाहनचालकांचा अपघात झाल्यास त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी एक लाखांचा विमा काढून देण्यात आला आहे. शिवसेनेच्या कसबा विधानसभा मतदार संघाच्या वतीने पुणे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांचा निषेधार्थ अनोख्या पध्दतीने हे आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेचे उपशहर प्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्या वतीने केलेल्या हटके आंदोलनात शहरप्रमुख संजय मोरे, शहर समन्वयक राजेंद्र शिंदे, संतोष भूतकर, नागेश खडके, नितीन परदेशी, अमोल हुलावळे, नंदू येवले, नितीन रावळेकर, सनी गवते, युवराज पारिख, दिनेश दाभोळकर, निलेश जगताप, प्रशांत पैलवान, रमेश क्षिरसागर, राजेश मोरे, हर्षद मालुसरे, गनी पठाण, राजेंद्र अबनावे, बकुळ डाकवे उपस्थित होते.
बाळासाहेब मालुसरे म्हणाले, पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने शहरात निकृष्ठ दर्जाचे रस्ते तयार केले. ते केवळ टेंडर काढून कमिशन गोळा करण्यात व्यस्त आहे. शहरातील अनेक भागांमध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पाणी पुरवठा, सांडपाणी वाहिनी अथवा केबल टाकण्यासाठी शहरामध्ये ठिकठिकाणी महापालिकेकडून खोदकाम करण्यात आले. मात्र त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात डागडूजी केल्यामुळे शहरातील अनेक रस्ते खचले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या खड्डयात पडून वाहचालकांचा अपघात झाल्यास त्यांना आर्थिक आधार म्हणून हा विमा काढण्यात आला.