पुणे : भारतीय ज्ञान साधना आणि भारतीय संस्कृती ही अत्यंत साधेपणाने असणारी आहे. आजच्या काळामध्ये हा सात्विक आविष्कार कमी होत चालला आहे. ही भारताची संस्कृती आणि ज्ञानसाधना धार्मिक संस्थांनी पुढे न्यायला हवी, अशी अपेक्षा प. पू. भागवताचार्य शरदशास्त्री जोशी यांनी व्यक्त केली.
श्री देवदेवेश्वर संस्थानांतर्गत सारसबाग मंदिरातील श्री सिद्धिविनायक देवतेच्या वार्षिक महोत्सवात श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाचा पुरस्कार प. पू. भागवताचार्य शरदशास्त्री जोशी (पुणे) आणि प्रा.स्वानंद पुंड (वणी) यांना डॉ. कल्याणी नामजोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागव, विश्वस्त सुधीर पंडित, पुष्कर पेशवा, जगन्नाथ लडकत, आशिष कुलकर्णी उपस्थित होते.
महाराष्ट्रामध्ये पुष्कळ कर्मयोगी आहेत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये यज्ञांची सत्रे केली आहेत आणि त्यांचा कर्ममार्ग उजळला आहे. आताचा योग वेगळा आहे, पूर्वीचा योग अंत:करणात ठेवा. कुंभच्या निमित्ताने योगींचे दर्शन होत आहे, असे डॉ. नामजोशी म्हणाल्या.
पुराणकथांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असायला पाहिजे. त्या समजून घेण्याच्या कथा आहेत. अनंत कोटी ब्रह्मंडात जे काही आहे ते आपल्यात आहे. त्यामळे या कथा आपल्यामध्ये पहायच्या आहेत. अष्ट विकारांवर मात करणारे अष्टविनायक आपल्यातच आहेत. आपल्यातील विकार सुटत नाहीत, परंतु ते नियंत्रित आणि सुनियोजित करता येतात, असे प्रा. पुंड म्हणाले.