महापालिका प्रशासनाचा निर्णय
पुणे – महापालिका मालकीच्या जागांवर शहरात 22 ठिकाणी अतिक्रमण करून झोपड्या थाटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा जागांवर आणखी झोपड्या वाढू न देता त्या ठिकाणी तत्काळ विकसन करत संबंधित जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यासाठी महापालिकेकडून आता स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.
महापालिकेच्या उपायुक्त (विशेष) डॉ. वनश्री लाभशेटवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. तसेच लाभशेटवार यांच्यावर एसआरए विभागाशी समन्वयाची जबादारीही असणार आहे.
शहरातील महापालिकेच्या जागांबाबत जिल्हा प्रशासनाकडे झालेल्या बैठकीत 22 जागांवर झालेल्या झोपड्यांचा विषय उपस्थित केला होता. या जागांवर झालेल्या झोपड्या जुन्या व संरक्षित झोपड्यांच्या परिसरात झाल्याने त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात तसेच अतिक्रमण काढण्यात प्रशासनास अडचण येत आहे. त्यामुळे आहे त्या जागेत आणखी झोपड्या न वाढू देता त्या ठिकाणी तत्काळ जागेचा पुनर्विकास करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी एसआरए विभागाशी समन्वय ठेवणे, महापालिका मालकीच्या व झोपड्पट्टी झालेल्या जागांच्या विकसनासंदर्भात धोरण ठरविणे या जागा एसआरच्या माध्यमातून विकसित करणे व त्यासाठीची आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे काम डॉ. लाभशेटवार यांच्याकडे असणार आहे.