विश्रांतवाडी – आमदारकीच्या काळात बापूसाहेब पठारे यांनी विश्रांतवाडी परिसरातील विकासकामे केली होती. सर्वप्रश्न सोडविण्यासाठी लक्ष घातले होते. एक चांगले व विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर विश्वास असल्यानेच आम्ही पाठिंबा देत आहोत, असे माजी नगरसेविका सुनिता साळुंखे यांनी सांगितले.
विश्रांतवाडीतील माजी नगरसेविका सुनिता साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते अनिल साळुंखे, नटराज साळुंखे यांनी असंख्य समर्थकांसह पठारे यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे या परिसरात पठारेंना त्यांची मदत होणार आहे. पठारे यांना सामाजिक संघटना, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा पाठिंबा वाढत आहे. पठारे यांच्या प्रामाणिकपणा, समाजसेवा आणि परिसरातील विकासकामे या गोष्टींवर विश्वास ठेवून काही जण उघडपणे तर अनेक कार्यकर्ते जाहीर न करता समर्थन देत आहेत.
नुकताच माजी उपसरपंच प्रीतम खांदवे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोहगावातील स्वर्गीय प्रतापदादा खांदवे-पाटील गटाने तसेच येरवड्यातील माजी नगरसेवक हनीफ शेख, ऍड.अय्युब शेख, सादिक शेख, फर्जाना शेख, भीम लहुजी सामाजिक संघटनेचे विनोद वैरागर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर पाठींबा दिला. या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक या समर्थनामुळे अधिक सक्रिय झाले आहेत. सर्वजण पठारे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत.
मतदारसंघाच्या प्रगतीसाठी परिश्रम घेणार : पठारे
विकासकामांच्या खात्रीमुळे मला मतदारसंघात पाठिंबा वाढत आहे. वाढत्या पाठिंब्यामुळे माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अथक परिश्रम घेणार आहे, असे बापूसाहेब पठारे यांनी सांगितले. पाठिंब्याबद्दल पठारे यांनी सर्वांचे आभारही मानले.