Pune : सिग्नलची वेळ तरी वाढवा

मुंढवा, केशवनगरमधील नागरिकांची मागणी

मुंढवा – मुंढवा-खराडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करताना महापालिकेचा रस्ते विभाग, वाहतूक पोलीस आदी यंत्रणा चक्रावून गेली आहे. रस्ता रुंदीकरण, भूसंपादन आदी प्रशासकीय अडचणी असल्या तरी महात्मा फुले चौकातील सिग्नलची वेळ तरी वाढविल्यास काहीअंशी वाहतूक कोंडी सुटू शकेल, त्यामुळे सिग्नल यंत्रणा तातडीने दुरुस्त करीत सिग्नलची वेळ वाढवावी, अशी मागणी मुंढवा, केशवनगर येथील स्थानिक वाहन नागरिकांसह चालकांकडून होत आहे.

मुंढवा येथील महात्मा फुले चौक, गांधी चौक, ताडीगुत्ता चौक, शिवाजी चौक, रासकर चौक, नदीवरील पूल, रेल्वे उड्डाण पूल या सर्व मार्गावर वाहतूक कोंडी असते. यातून मुख्य चौक असलेल्या महात्मा फुले चौकात वाहतूक येऊन थांबते, या चौकात असलेल्या सिग्नलची वेळ कमी आहे. त्यामुळे चारही बाजूच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात.

महात्मा फुले चौकात हडपसर येथून केशवनगरकडे व खराडीहून मुंढव्याकडे वळण्यासाठी सिग्नल सुरू करण्यात दिला आहे, वाहनांच्या संख्येच्या तुलनेत त्याची वेळ खूपच कमी आहे. या सिग्नलच्या अगदी दोन ते चार वाहने सिग्नल ओलांडून मार्गस्थ होतात. सिग्नल बंद झाल्याने काही वाहने रस्त्याच्या मधोमध थांबतात, यातूनही वाहूतक कोंडी होत आहे. त्यामुळे खराडीकडून मुंढव्याकडे वळणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. यावर उपाय म्हणून मुंढव्याकडे वळणाऱ्या व केशवनगरकडे जाणाऱ्या सिग्नलची वेळ वाढविणे गरजेचे आहे. तसेच वळणाऱ्यांसाठी खराडीकडून नदीपुलावरून येणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेट लावून लेन तयार करणे गरजेचे असून याची अंमलबजावणी वाहतूक पोलिसांनी करावी, अशी मागणी मुंढवा, केशवनगरमधील स्थानिक वाहनचालकांकडून होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.