पुणे – वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत २१ जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश पौड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बरडे यांनी शनिवारी दिले. मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी पूजा खेडकर यांची आई मनोरमा, वडील दिलीप, अंगरक्षकासह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या मनोरमा यांना महाड परिसरातून पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली. याबाबत शेतकरी पांडुरंग कोंडिबा पासलकर (वय ६५, रा. केडगाव पुनर्वसन, ता. दौंड) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
मनोरमा यांच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी (दि. २०) संपली. त्यांना पौड न्यायालयात पोलिसांनी हजर करण्यात आले. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी प्रकरणाचा सखोल तपास करायचा असून, पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
जेवण चांगले मिळत नसल्याची तक्रार
पोलीस कोठडीत चांगले जेवण मिळत नसल्याची तक्रार मनोरमा खेडकर यांनी न्यायालायत केली. पाेलिसांनी त्यांचे आरोप फेटाळून लावले. दरम्यान, मुळशीतील शेतकऱ्याला धमकाविण्यासाठी खेडकर ज्या मोटारीतून गेल्या होत्या, ती कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.