पुणे – शहर तसेच उपनगरीय परिसरात डेंग्यू, चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढत असून, याची लागण झालेल्या रुग्णांत वाढ झाली आहे. पाऊस आणि रोगट हवामानामुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पुण्यात डेंग्यू, टायफाइड, चिकुनगुनिया, काविळीच्या आजाराचे प्रमाण वाढलेले दिसून येते. दूषित पाणी, डास यांच्यामुळे या रोगाचा फैलाव वेगाने होत असून, ताप, अतिसार, उलट्या होणे, डोकेदुखी आणि सांधेदुखीसारखी लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येत आहेत.
गेल्या दोन आठवड्यांत या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे. दररोज बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणारे बहुतांश रुग्ण हे तापाचे असतात. या रुग्णांमध्येही गेल्या दोन आठवड्यांत 7 ते 10 टक्क्यांनी वाढ झाल्याचे जनरल फिजिशियन्सचे म्हणणे आहे. करोनाबाधितांची संख्या सध्या स्थिर असली तरी वरील रोगाने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
पावसाळ्यात दूषित पाणी आणि वातावरण बदलामुळे विविध संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होतेच. यात प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया, टायफाइड, कावीळ आणि चिकुनगुनिया रुग्णांची संख्या अधिक दिसून येत आहे. जुलै 2021 मध्ये 10 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते, तर 1 चिकुनगुनियाचा रुग्ण आढळून आला होता. आता या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली असून दररोज डेंग्यू, टायफाइड आणि चिकुनगुनियाचे 10 ते 15 रुग्ण चाचणीसाठी येतात. यातील 50 टक्के रुग्णांचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याचे दिसून येत आहे.
चिकुनगुनियाच्या रुग्णांच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. डासांपासून या रोगाचा फैलाव होतो. डासांमार्फत चिकुनगुनियाचे विषाणू शरीरात गेल्यानंतर केवळ 15 ते 20 मिनिटांतच त्याचे लक्षण दिसायला सुरुवात होते. सांध्यांमध्ये तीव्र वेदना, मळमळ, पुरळ येणे, तीव्र डोकेदुखी, थकवा, उठता-बसता न येणे, ताप अशी लक्षणे दिसून येतात, तर डेंग्यूमध्येही तीव्र ताप, थकवा, अंगदुखी अशी लक्षणे आढळतात.
यातील बहुतांश आजार हे डासांमार्फत पसरत असल्याने डासांची पैदास होणाऱ्या जागा स्वच्छ ठेवणे, पाणी साठू न देणे, डासांची अळी आढळल्यास त्वरित जंतूनाशक फवारणी करणे आदी उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय काविळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाणी उकळून आणि गाळून पिणे अधिक हितकारक आहे.
डेंग्यूबाधितांची आकडेवारी
महिना संशयित बाधित
जानेवारी 27522
फेब्रुवारी 7906
मार्च 19102
एप्रिल 16901
मे 1620
जून 2010
जुलै 10786
ऑगस्ट 8718