पुणे –महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेच्या सभासदांची संख्या 15 हजारांच्या वर गेली आहे. या सभासदांच्या कार्डची मुदत 31 मार्च रोजी संपली आहे. त्यामुळे कार्ड नूतनीकरणासाठी लाभार्थी महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीच्या कार्यालयात गर्दी करत आहेत.
मुख्य इमारतीत अपुरे कर्मचारी असल्याने सभासद नूतनीकरणास वेळ लागत आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ही सभासद नूतनीकरण सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली आहे. सर्वसामान्य, गोरगरीब नागरिक व दारिद्रय रेषेखालील नागरिक यांना या योजनेचा अनेक वर्षांपासून लाभ मिळत आहे. दि. 1 एप्रिलला आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर शहरातील अनेक नागरिकांनी शहरी गरीब योजनेचे कार्ड काढण्यासाठी महानगरपालिकेकडे धाव घेतली. नवीन इमारतीच्या तळमजल्यावर शहरी गरीब योजनेचे कार्यालय असून तेथे गर्दी होत आहे. या योजनेचे कार्ड काढण्यासाठी रांग होऊन कार्ड काढण्यास वेळ जात असल्याने नागरिकांची चिडचिड होऊन त्यामधून वादाचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे सर्व क्षेत्रीय कार्यालयात ही सुविधा दिल्यास हे काम अधिक सुलभ होणार असल्याचे पत्र धुमाळ यांनी आयुक्त विक्रमकुमार यांना दिले आहे.