पुणे –महापालिकेच्या मिळकतकर विभागास आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांतच 1 एप्रिल ते 27 मे या कालावधीत तब्बल 714 कोटी 17 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 186 कोटींनी अधिक आहे. मागील वर्षी याच कालावधीत 528 कोटी 97 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
महापालिकेकडून आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत कर भरणाऱ्या नागरिकांना मिळकतकरातील सर्वसाधारण करात 5 ते 10 टक्के सवलत दिली जाते. त्यासाठी 31 मे ही मुदत निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे जास्तीत जास्त पुणेकर या दोन महिन्यांत कर भरतात. दरम्यान, यंदा दि. 1 एप्रिलपासून सुमारे 4 लाख 92 हजार 752 मिळकतकरधारकांनी कर जमा केला आहे. तर या मिळकतधारकांना 5 ते 10 टक्केच्या सवलतीपोटी महापालिकेने सुमारे 16 कोटींचा कर माफ केला आहे. या कर संकलनात सर्वाधिक 466 कोटींचा कर ऑनलाइन जमा करण्यात आला असून, सुमारे 70 कोटींची रक्कम रोख भरण्यात आली आहे. तर धनादेशाद्वारे 214 कोटींचा महसूल जमा करण्यात आला आहे.
महापालिकेच्या मिळकतकर सवलतीत भरण्यासाठी पालिकेकडून 31 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या मुदतीत कर भरावा. शनिवारी आणि रविवारीही सुट्टीच्या दिवशीही कर भरण्यासाठी महापालिकेची नागरी सुविधा केंद्र सुरू असतील.
– अजित देशमुख, कर संकलन उपायुक्त, मनपा