पुणे –महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 6,200 कोटींचा महसूल मिळणार असल्याचा दावा आयुक्त विक्रम कुमार यांनी केला आहे. मात्र, त्यानंतरही या वर्षात महापालिकेस तब्बल 2,170 कोटींची तूट येणार आहे.
2021-22 या आर्थिक वर्षासाठी महापालिका आयुक्तांनी 7,650 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात सुमारे 700 कोटींची वाढ करत स्थायी समितीने 8,350 कोटींचे अंदाजपत्रक मान्य केले. तर, जानेवारी 2022 अखेर प्रशासनाकडे 5,443 कोटींचा महसूल जमा झाला असून, उर्वरित दोन महिन्यांत आणखी 800 कोटींचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे महापालिका पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्रमी उत्पन्न मिळविणार आहे. गेल्या काही वर्षांत बांधकाम क्षेत्रात असलेली मंदी आणि ही मंदी हटत असतानाच आलेले करोना संकट यामुळे महापालिकेच्या उत्पन्न स्रोतांवर मर्यादा आलेल्या असतानाच हे उत्पन्न महापालिकेसाठी दिलासादायक ठरणार आहे, असे बोलले जात आहे.
जानेवारीअखेर 2 हजार कोटींची शिल्लक
अंदाजपत्रकानुसार जानेवारी 2022 अखेर प्रशासनाचा 3,330 कोटींचा खर्च झाला आहे. त्यामुळे जानेवारीअखेर पालिकेच्या तिजोरीत सुमारे 2,100 कोटींचा महसूल शिल्लक आहे. तर, या आर्थिक वर्षात भांडवली कामेही करोना संकटामुळे तसेच वित्तीय समितीने खर्चावर नियंत्रण आणल्याने कमी झालेली आहेत. त्यामुळे पालिकेस आर्थिक बाबतीत हे वर्ष दिलासा देणारे ठरणार असून, त्याच आधारावर उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असतानाही आयुक्तांकडून आपल्या अंदाजपत्रकात गतवर्षीपेक्षा 900 कोटींनी वाढ केलेली असल्याचे चित्र आहे.