पुणे – प्रदूषण नियंत्रणासाठी अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका

पुणे – औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे (एमपीसीबी) सुरू असलेल्या “स्टार रेटिंग’ हा उपक्रमाला मनुष्यबळाच्या अभावाचा फटका बसत आहे. मंडळाकडे असलेल्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करणे शक्‍य होत नसल्याची माहिती मंडळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणकारी कंपन्यांवर देखरेख करण्यासाठी एमपीसीबीतर्फे “स्टार रेटिंग’ हा उपक्रम राबविला जातो. कंपन्यांमधून निर्माण होणाऱ्या प्रदूषणकारी घटकांवर देखरेख ठेवत त्याचा “रिअल टाइम’ अहवाल मंडळाकडून जाहीर केला जातो. शहरातील हवेचे प्रदूषण करणाऱ्या या कंपन्यांना एक ते पाच याप्रमाणे “स्टार’ रेटिंग देण्यात येते. यामध्ये सर्वाधिक प्रदूषणकारी कंपनीला एक, तर सर्वांत कमी प्रदूषण करणाऱ्या कंपनीला पाच स्टार असे मानांकन दिले जाते. मंडळातर्फे नुकतेच शहरातील 17 कंपन्या या अतिप्रदूषित कंपन्या म्हणून घोषित करण्यात आल्या होत्या. यापैकी बहुतांश कंपन्या रसायन आणि धातूकाम क्षेत्राशी निगडीत आहेत.

स्टार रेटिंग उपक्रमांतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयातर्फे ही पाहणी केली जाते. तसेच विभागीय कार्यायांना प्रदूषणकारी कंपन्यांवर तातडीने कारवाईचे आदेशही दिले जातात. मात्र पुणे विभागाचा विस्तार आणि कामाचे स्वरूप पाहता मंडळामध्ये मनुष्यबळाची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळेच या कंपन्यांवर कारवाई करण्यात मोठी अडचण निर्माण होत असल्याचे मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.