पुणे –आयुक्त विक्रम कुमार यांनी नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतील विकासकामांना मान्यता देण्यास नकार दिला आहे. त्यावरून भाजप आणि आयुक्त विक्रम कुमार यांच्यात वाद सुरू आहेत.
या वादांच्या आडून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपवर निशाणा साधला असून, “आयुक्त हे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले काम करत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा त्यांना पाठिंबा आहे,’अशी भूमिका पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मांडली आहे.
याबाबत जगताप यांनी दिलेल्या निवेदनानुसार, “गेल्या साडेचार वर्षांपासून महापालिकेत भाजपला काहीच कर्तृत्व सिद्ध करता आले नाही. उलट अस्ताव्यस्त कारभाराचेच दर्शन पुणेकरांना त्यांनी घडवले आहे.
महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शहराचे हित जोपासले गेले नाही, तरी चालेल पण स्वत:चे हित जोपासले गेले पाहिजे, या उद्देशातून आयुक्त कुमार आणि प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
करोनामुळे घटलेले उत्पन्न आणि संभाव्य तिसरी लाट याचा विचार करून आयुक्त हे आर्थिक निर्णयाबाबत जपून पावले टाकत आहेत. पण, भाजपकडून आयुक्तांची भूमिका, त्यामागील कारणे व भविष्याचा विचार याबाबत काहीही देणे-घेणे नसल्याचेच सत्ताधाऱ्यांच्या वर्तनातून दिसून येत आहे. त्यातूनच आयुक्त व प्रशासनावर दबाव आणून आपल्याला हवा तसा निर्णय घेण्याची जणू स्पर्धाच सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू आहे.’
…पण, आठवडाभरातच “यू-टर्न”
दरम्यान, अवघ्या आठवडाभरापूर्वीच स्थायी समितीत प्रशासनाने आयत्यावेळी अनेक प्रस्ताव आणल्याचे सांगत हेच आयुक्त सत्ताधारी भाजपचे काम करत असल्याची टीका राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष जगताप यांनी केली होती. त्याला सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आयुक्तांची तक्रार केली होती. पण, आता आठवडाभरातच राष्ट्रवादी कॉंग्रेस आयुक्तांची पाठराखण करताना दिसून येत आहे.