पुणे – ससून रुग्णालयात प्रसूत झालेल्या आणि बाधित असलेल्या महिलांना झालेल्या बाळांमधील सुमारे 22 बाळांना पोटात असतानाच आईच्या नाळेतून संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे “व्हर्टिकल ट्रान्स्मिशन’ असून, सर्व बाळं यातून सुखरूप बरी झाली आहेत.
करोनाचा संसर्ग झालेल्या गरोदर महिलांना ससूनमध्ये उपचार सुरू होते. त्यांची प्रसुती झाल्यानंतर बाळाचीही तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ही बालके जन्मत:च करोना पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले. त्यातील काही बालकांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. मात्र, ती सुखरूप त्यातून बाहेर आली.
याशिवाय 17 बालकांना जन्म झाल्यानंतर बाधित मातेच्या संसर्गात आल्यानंतर करोना झाल्याचे दिसून आले. मात्र, उपचारानंतर तेही पूर्णपणे बरे झाल्याची माहिती, ससूनमधील बालरुग्ण विभागाच्या प्रमुख प्रो. डॉ. आरती किणीकर यांनी दिली.
अशाप्रकारचा संसर्ग होतो, याबाबतचे संशोधन ससूनमध्ये सुरू होते. त्याबाबतचा संशोधित केलेला पेपरही ससूनच्या बालरुग्ण विभागाने प्रसिद्ध केला आहे. याबाबतचे संशोधन ससूनमध्ये सुरू आहे.
ससूनची स्वत:ची प्रयोगशाळा असल्याने आणि तेथे संशोधनही होत असल्याने या जन्मलेल्या बाळांची संशोधनाच्या दृष्टीनेही तपासणी करण्यात आली. बाळ जन्मल्यानंतर 24 तासांच्या आत तीन तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये प्लेसेंटा, नाळ यातील स्वॅब तसेच नाकातील स्वॅब घेऊन त्याची तपासणी केली असता, नाळेद्वारे करोनाचा संसर्ग झाल्याचे तपासणीतून दिसून आले आहे.
-डॉ. आरती किणीकर,
बालरुग्ण विभाग प्रमुख, ससून सर्वोपचार रुग्णालय