पुणे : अतिवृष्टी, पूरस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य

मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना आपत्तीपूर्व प्रशिक्षण : रेल्वे पूर मदत दल सज्ज
पुणे  – अतिवृष्टीमुळे अनेकदा ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे थांबवावी लागते. त्यामुळे प्रवासीदेखील अडकतात. त्यावर प्रवाशांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने ‘रेल्वे पूर मदत दल’ (आरएफआरटी) सज्ज ठेवण्यात येत आहे. याबाबत रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. रेल्वे परिसरात पूरस्थिती उद्भवल्यास ही दले मदतीसाठी सज्ज असतील.

रेल्वेस्थानके आणि रेल्वेच्या परिसरात पूरस्थिती उद्भवल्यास मदत मिळण्याच्या अनुषंगाने मोटारयुक्त बोटी आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा समावेश असणारे “रेल्वे पूर मदत दल’ (आरएफआरटी) तयार केले आहे. मध्य आणि पश्‍चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल आणि अरुण कुमार यांनी नुकतीच या पथकांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केली. यासह ठाणे तलाव येथे रेल्वे प्रवाशांचा बचाव आणि मदत करणाऱ्या मॉकड्रीलची पाहणी केली.

प्रत्येक टीममध्ये उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षकांसह6 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. “एनडीआरएफ’ने आतापर्यंत15 जणांना प्रशिक्षण दिले असून, यामध्ये 5 महिलांचा समावेश आहे. पावसाचा अंदाज, पूरस्थितीची नोंद आदींवर “वॉच’ ठेवत पूरसदृष्य स्थिती असल्याचे समजताच, रेल्वे अडकलेली असल्यास हे पथक पोहोचणार आहे.

आपत्कालीन स्थितीत प्रवाशांनी घाबरू नये, याची खात्री करणे ही पहिली कृती असेल. बचाव आणि मदत कार्यात पोहोचणाऱ्या रेल्वे टीम तयार असून, सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचून सुटका आणि मदत उपलब्ध करुन देणार असल्याचे अरुण कुमार म्हणाले.

असा असेल अलर्ट
“ब्लू ‘ – पाण्याची पातळी रेल्वे रूळांपासून चार इंचांवर पोहोचल्यास, याबाबतची हालचाल सुरू होईल.
“ऑरेंज ‘ – पाणीपातळी रेल्वे पातळीपासून पाच इंचांच्यावर पोहोचल्यास, टीम घटनास्थळी दाखल होईल.
“रेड’ – कोणत्याही स्थानकावर रेल्वे थांबवलेली असेल आणि पाण्याची पातळी तीन फूट असल्यास मदतकार्य सुरू होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.