पुणे- पूर्वी समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्ये पालिकेने सुधारित कर आकारणी सुरू केली आहे. तसेच नवीन 23 गावांमध्ये पुढील आर्थिक वर्षापासून नव्याने करआकरणी सुरू केली जाणार आहे. पण, या गावांमध्ये रेडीरेकनरच्या दराने करआकारणी न करता 2007 च्या दरानुसार कर आकारणी करावी, अशी मागणी माजी महापौर वैशाली बनकर आणि विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली आहे.
याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत देण्यात आला असून मंगळवारी होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेत 2017 मध्ये 11 तर पाच महिन्यांपूर्वी 23 गावे घेण्यात आली आहेत. मात्र, या गावांमध्ये अद्यापही महापालिकेस आवश्यक त्या सोयीसुविधा देता आलेल्या नाहीत. त्यातच आता पालिकेकडून नवीन गावांमध्ये पालिकेकडून करआकारणी करण्यात येणार असून ग्रामपंचायतीपेक्षा ही कराची रक्कम अधिक असणार आहे. त्यामुळे एका बाजूला मुलभूत सोयी नसतानाही दुसऱ्या बाजूला आकारण्यात येणारा वाढीव कर ही या गावातील नागरिकांवर अन्याय करणारी बाब असणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव देण्यात आल्याचे बनकर आणि धुमाळ यांनी सांगितले.