पुणे – मागील वर्षी गणेश विसर्जनासाठी सव्वा कोटी रुपये भाडे भरून फिरते हौद घेण्यात आले. या प्रकरणात काम न करताही कंत्राटदारास 22 लाख रुपये दिल्याच्या आरोप सजग नागरिक मंचाने केला आहे.
संबंधित ठेकेदाराने 15 क्षेत्रीय कार्यालयांना काही ठराविक दिवसच हौद पुरविले. पण, त्यांना 10 दिवसांचे पूर्ण बिल देण्यात आले आहे. या प्रकरणी महापालिकेने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने आयुक्तांकडे केली आहे. गणेशोत्सव दहा दिवसांचा असतानाही घनकचरा व्यवस्थापन विभागाने या ठेकेदारास 11 दिवसांचे बिल दिल्याचेही वेलणकर म्हणाले.
“सप्टेंबर 2021 मध्ये पुणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी 60 फिरते हौद 11 दिवसांसाठी भाड्याने घेतले होते. त्यासाठी सर्वांत कमी टेंडर 1 कोटी 26 लाख 19 हजार 860 रुपयांचे आले होते. त्यानुसार संबंधित कंत्राटदाराला काम देण्यात आले. त्या कंत्राटदाराने 15 क्षेत्रीय कार्यालयांत प्रत्येकी चार हौद 11 दिवस पुरवणे गरजेचे होते. तसे न केल्यास त्याला प्रत्येक न पुरवलेल्या हौदामागे प्रतिदिन 25 हजार रुपये दंड ठोठावला जाणार होता. त्यानुसार कंत्राटदाराने 11 दिवस 60 हौद उपलब्ध करुन द्यायचे होते. त्यापोटी त्याला महापालिका 1,26,19,860 रुपये देणे अपेक्षित होते. घनकचरा विभागाने कंत्राटदाराने 10 दिवस हौद उपलब्ध करून दिले असतानाही पूर्ण पैसे म्हणजे 11 दिवसांचे दिले आहेत,’ असे वेलणकर म्हणाले आहेत.