Pune : पुण्यात अनंत चतुर्थदशीच्या दुसऱ्या दिवशीही गणपती विसर्जनची मिरवणूक सुरू आहे. मानाच्या गणपती विसर्जन मंगळवारी झाल्यानंतर इतर गणपतीचे विसर्जन अद्यापही सुरू आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. साधारण 27 तास होऊन गेल्यानंतरही केळकर रोड, लक्ष्मी रोड, टिळक रोड येथे मिरवणूक अजून सुरू आहे. तर कुमठेकर रोड वरील मिरवणुका संपल्या आहेत.
अलका चौकाच्या पुढे सार्वजनिक गणेश मंडळ एका जागी थांबून डीजे वाजवत होते. त्यामुळे ऐकत नसलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून चोप देण्यात आला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या मंडळाची मोठी कोंडी झाली. या ठिकाणी काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी येत वाद थांबावत त्या गणेश मंडळाला पुढे सरकवले. आतापर्यंत 171 गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन झाले आहे.
रस्ते बंद विविध भागात वाहतूक कोंडी
अद्यापही मिरवणूका सुरू असल्याने पुण्यातील अनेक रस्ते बंद असल्याने पुण्यातील विविध भागात वाहतूक कोंडी झाली आहे. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. अजूनही मिरवणुका सुरू असल्याने काही रस्ते अद्याप बंदच असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची रस्त्यावर गर्दी झाली आहे.
केळकर रस्तावर आज दुपारी 12 वाजे पर्यंत एकूण 86 गणेश मंडळांचा विसर्जन मिरवणुकीत सहभाग झाले. तर पुण्यातील अलका चौकातून आतापर्यंत 117 मिरवणुका गेल्या आहेत. पोलिस मिरवणुका लवकर संपवाव्या यासाठी प्रयत्न करत आहेत. मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचे आवाहन गणेश मंडळांना केलं जात आहेत.
मिरवणूक संपण्यासाठी 2 ते 3 तास लागण्याची शक्यता
गेल्या वर्षी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मिरवणूक संपली होती. तर यंदाच्या मिरवणूका संपण्यासाठी अजून 2 ते 3 तास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही गणपती विसर्जन मिरवणुका उशिरापर्यंत चालणार असे चित्र पाहायला मिळत आहे.