पुणे – दाखल्यांचे दरपत्रक तातडीने फलकावर लावा

विद्यार्थी, पालकांची लूट : नागरी सुविधा केंद्र, महा-ई सेवा केंद्रांना जिल्हा प्रशासनाचे आदेश

पुणे – दहावी-बारावीच्या निकालानंतर नागरी सुविधा केंद्र आणि महा-ई सेवा केंद्रात विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी विद्यार्थी-पालकांची गर्दी होत आहे. याचा फायदा घेत या केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून जादा पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर नागरी सुविधा केंद्र आणि महा-ई सेवा केंद्रात दाखल्यांसाठीचे दरपत्रक फलकावर लावण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तसेच जे केंद्रचालक अथवा कर्मचारी दरपत्रकापेक्षा जादा रक्‍कम आकारतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली.

परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र आणि अधिवास दाखला असे विविध दाखले घेण्यासाठी नागरी सुविधा केंद्रात विद्यार्थी-पालकांची झुंबड उडते. थोडक्‍या काळात हजारो अर्ज आल्याने जिल्हा प्रशासनाचीही दाखले देताना धांदल उडते. लवकर दाखले मिळावेत, अशी पालकांची अपेक्षा असते. याबाबींचा गैरफायदा नागरी सुविधा केंद्रातील अथवा ई सेवा केंद्रातील कर्मचारी घेतात. याबद्दल जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी आल्या आहेत.

मध्यस्थांची मदत घेऊ नये
विविध प्रकारचे दाखले हे पुणे स्टेशन येथील नागरी सुविधा केंद्राबरोबरच शहरात असलेल्या महा-ई सेवा केंद्रातूनही उपलब्ध करून देण्यात येत आहे. दाखल्यांसाठी कर्मचाऱ्यांनी जादा पैसे मागितल्यास संबधित तहसीलदार अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने संपर्क करून तक्रार दाखल करावी. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. दाखल्यांसाठी मध्यस्थांची मदत घेऊ नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.