पुणे – डॉक्‍टरांवरील हल्ल्याचा आयएमएकडून निषेध

पुणे – करोनाच्या लढाईत रुग्णांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांसह कर्मचाऱ्यांवर देशात विविध ठिकाणी प्राणघातक हल्ले होत आहेत. त्याबाबत डॉक्‍टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ येत्या शुक्रवारी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने (आयएमए) राष्ट्रीय निषेध दिन पाळण्यात आला. 

यावेळी काळ्या फिती लावून निषेध व्यक्‍त करण्यात आला. याबाबत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त आणि खासदार यांना निवेदन देण्यात आले, अशी माहिती आयएमएच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. बी. एल. देशमुख, सचिव डॉ. सुनील इंगळे, डॉ. अलका क्षीरसागर आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी दिली.

निषेध दिन पाळताना आयएमएचे सदस्य, डॉक्‍टर यांनी काळ्या फिती, काळा मास्क परिधान केला. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याचिका पाठविणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. “जीव वाचवणाऱ्या डॉक्‍टरांचे रक्षण करा’ असे घोषवाक्‍य आहे.

करोनाच्या लढाईमध्ये वैद्यकीय व्यावसायिक व कर्मचाऱ्यांनी जीवाची जोखीम पत्कारून रुग्णांना वाचविण्याचे काम केले आहे. तरीही आसाम, बिहार, पश्‍चिम बंगाल, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रातील डॉक्‍टरांवर प्राणघातक हल्ले झाले आहेत. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच डॉक्‍टरांना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा निषेध दिन पाळण्यात आला. यावेळी सर्व आरोग्य व्यवस्था सुरू होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.