पुणे, दि. 18 -ऐतिहासिक पुण्याच्या विविध वारसा स्थळांविषयी एकत्रितपणे आजवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मात्र पुण्याच्या पूर्वेकडील कोरेगाव पार्क परिसराविषयी कॉफी टेबल बुक ज्येष्ठ पत्रकार विनिता देशमुख यांनी लिहिले असून, सुरेश तालेरा यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक आकाराला आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले.
“कोरेगाव पार्क : आयकॉनिक नेबरहुड’ असे या पुस्तकाचे नाव असून, यामध्ये कोरेगाव पार्क इस्टेटमध्ये राहत असलेल्या विविध राजघराणी आणि उद्योजकांच्या निवासस्थानांविषयी माहिती वाचायला मिळते. ब्रिटिश काळातील तेव्हाच्या संस्थानांच्या निवासस्थानापासून ते सध्याच्या अव्वल दर्जाच्या उद्योगपतींच्या निवासस्थानापर्यंतची एक अनोखी कथा म्हणजे हे पुस्तक आहे, असे लेखिका देशमुख यांनी सांगितले. यावेळी पुस्तकाचे संकल्पक सुरेश तालेरा उपस्थित होते.
मूळ कोरेगाव पार्क
कोरेगाव पार्कच्या चार गल्ल्या मिळून कोरेगाव पार्क इस्टेटचा समावेश होतो आणि हे मूळ कोरेगाव पार्क आहे, हे अनेकांना माहीत नाही. गेल्या दोन दशकांपासून अनेक बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनी खरेदीदारांना आमिष दाखवण्यासाठी या खानदानी परिसराच्या प्रतिमेचे भांडवल केले आहे.
मूळ कोरेगाव पार्क इस्टेट हा एक अद्वितीय परिसर आहे, जो पुणे महापालिकेच्या विशेष विकास नियंत्रण नियमांचा परिपाक आहे. म्हणूनच, याला वारसा परिसराचा दर्जा प्राप्त झाला आहे. आपल्या शहरातील इमारतींच्या बांधकामांच्या पार्श्वभूमीवर अनेक वेळा नियमांचे उल्लंघन होत असताना, कोरेगाव पार्क इस्टेटा सारख्या अतिपरिचित क्षेत्रांचे संवर्धन हे पर्यावरणासाठी आणि भावी पिढीसाठी अत्यावश्यक आणि मौल्यवान आहे, असेही देशमुख म्हणाल्या.
जिद्दीने दिला लढा
गेल्या पाच दशकांमध्ये या बंगल्यांमधील रहिवाशांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने बहुमजली इमारती बांधण्यासाठी परवानग्या मिळवून देणाऱ्या विकासकांच्या नजरा वाचवण्यासाठी जिद्दीने लढा दिला आहे. रहिवासी सुप्रीम कोर्टात गेले, असेही त्यांनी सांगितले. पूर्वी कार्ल खंडालावाला आणि सुरेश तालेरा यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
अत्यंत आकर्षक मुखपृष्ठ सुंदर पानांची रचना आतील छायाचित्रे आणि पेंटिंग्ज यामुळे हे पुस्तक एक दर्जेदार ऐतिहासिक ठेवा बनले आहे, अशी प्रतिक्रिया तालेरा यांनी दिली.
1920 पासूनचा इतिहास
सन 1920 च्या दशकापासूनचा इतिहास या पुस्तकात देण्यात आला आहे. जेव्हा ब्रिटिश सरकारने हा प्रकल्प सुरू केला, तेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातील बहुतेक संस्थानिकांनी आणि श्रीमंत पारशी आणि व्यापाऱ्यांनी येथील जागा विकत घेतल्या आणि बंगले बांधले. ज्याची रचना आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त वास्तुविशारदांनी केली. “ओशो कम्यून’ने या शांत परिसराचा रंग बदलला. अलीकडील उद्योगपतींनी येथे मालमत्ता खरेदी करून ते त्यांचे निवासस्थान बनवले. दीपा बजाज, पारुल मेहता, मोरवीच्या महाराणी, बडोद्याच्या राजमाता, अब्बास जसडेनवाला, फरहाद आणि नौशाद फोर्ब्स आणि सबिना संघवी यांसारख्या सेलिब्रिटींच्या जुन्या आठवणींच्या कहाण्या या पुस्तकात आहेत.