पुणे : वन विभागाने शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमाराला मौजे रावेत येथील नेवाळे वस्ती येथे अवैध कोळसा वाहतूक करणाऱ्या दोन गाड्या जप्त केल्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा होता, जो कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय वाहतूक केला जात होता.
रात्रीच्या गस्तीदरम्यान संपूर्णपणे झाकलेले दोन संशयित टेम्पो पिंपरी- चिंचवड भागात वाहतूक करताना निदर्शनास आले. त्यांचा पाठलाग करून टेम्पो अडवले असता, त्यातील चालक पळून गेले. सदर टेम्पोची तपासणी केली असता त्यात, अवैध कोळसा आढळून आला. टेम्पो ताब्यात घेऊन वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हा कोळसा कुठून आणला आणि कुठे घेऊन जाणार होते, याचा तपास केला जात आहे. वन विभागाने जप्त केलेला कोळसा आणि टेम्पो वनपरिक्षेत्राच्या भांबुर्डा कार्यालयात जमा केले आहेत. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले, आरागिरणी वनपाल विजय शिंदे आणि वनरक्षक सुरेश बर्ले यांनी मध्यरात्री केली.
वन विभागाने अवैध कोळसा वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली असून, जंगलातील आणि आसपासच्या परिसरात गस्त वाढवली आहे. अवैध कोळसा वाहतूक, तसेच वनक्षेत्रात आग लागणे आदींसंदर्भात १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.