सिंहगडरस्ता – स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर स्मारक व उद्यान सिंहगड रस्त्यावर महापालिकेतर्फे उभारण्यात आले आहे. दगडी कामाचा उत्कृष्ट नमुना या स्मारकात पहायला मिळतो तसेच फरसबंदी ही अप्रतिम आहे. स्मारकामध्ये विविध प्रकारची ऐतिहासिक शिवकालीन शिल्पे लावण्यात आले आहेत. तर उद्यानामध्ये डबलबार, सिंगलबार, मल्लखांब अशी व्यायामाची पारंपरिक साधने बसविण्यात आली आहेत. परंतु, करोना कालावधीत या स्मारकाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने याची दुरवस्था झाली आहे.
उद्यानाचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्यामुळे नागरिक आतमध्ये जात येत नाही. तसेच आतील परिसरात राडारोडा, झाडं-झुडपं वाढल्यामुळे स्मारकाची अवस्था बकाल झाली आहे. आतील भागात असलेल्या पुतळ्यांचीही दुरवस्था झाली आहे.
महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे या स्मारकाचे काम करण्यात आले त्यानंतर ते मालमत्ता विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. मालमत्ता विभागाकडून के क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. या विभागाकडून “ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर संस्थांना निविदा काढून 11 महिन्याच्या करारावर हे स्मारक हस्तांतरीत करण्यात येते. सध्या, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान या संस्थेकडे या स्मारकाचा ताबा आहे.
इतिहास जपणाऱ्या संस्थेलाच स्मारक देखभालीची निविदा देण्यात यावी. ज्या संस्थेकडे हे स्मारक ताब्यात आहे, त्यांचे स्मारकाकडे दुर्लक्ष आहे. 30 वर्षे ही संस्था कशी काय स्मारकाची देखभाल करणार आणि महापुरुषांचा इतिहास वारसा जपणार असा प्रश्न आहे. – विकास पासलकर, वीर बाजी पासलकर यांचे वंशज
आम्ही निविदा भरलेली आहे. परंतु, प्रशासनाकडून अद्याप उत्तर आलेले नाही. सध्या, आम्ही स्वखर्चाने या स्मारकाची देखभाल करत आहोत. – रवींद्र शिंगणापूरकर, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान
या स्मारकाची निविदा प्रलंबित आहे. लवकरच आम्ही पाठपुरावा करून निविदा काढू आणि स्मारकाचे काम मार्गी लावू नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
– संतोष वारुळे, उपायुक्त, क्रीडा व सांस्कृतिक विभाग
प्रशासकीय कारभारामुळे निविदा प्रक्रिया रखडली आहे. आम्ही वारंवार पाठपुरावा करून निविदा काढण्यासाठी मनपा प्रशासनाला विनंती आणि पाठपुरावा करीत आहोत.
– आनंद रिठे, माजी नगरसेवक