पुणे – करोनामुळे सध्या महाविद्यालये बंद आहेत. या काळात ज्या सुविधांचा वापर विद्यार्थी करत नाहीत, त्यांची फी आकारू नका असे सक्त आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत.
या आदेशानुसार, ग्रंथालय शुल्क, प्रयोगशाळा, जिमखाना शुल्क, संगणक सुविधा शुल्कात 50 टक्के, उपक्रम शुल्कात 75 टक्के, परीक्षा शुल्कात 25 टक्के, उद्योग भेट शुल्क, महाविद्यालय नियतकालिक शुल्क, प्रयोगशाळा ठेव, अन्य ठेवी, आरोग्य तपासणी शुल्क, आपत्ती व्यवस्थापन शुल्क, अश्वमेध महोत्सव शुल्कात 100 टक्के कपात करण्यात आली आहे. 2021-22 या वर्षासाठी विद्यापीठातील शैक्षणिक विभाग, संलग्न महाविद्यालये आणि परिसंस्थांना ही शुल्क कपात लागू असेल, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने शुल्क कपातीसंदर्भात समिती नेमली होती. सर्वंकष विचार करून अन्य प्रकारच्या शुल्कात समितीने कपातीचा निर्णय घेतला. त्यानुसार महाविद्यालयांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. गतवर्षी व यंदाच्या वर्षीही करोना पार्श्वभूमीवर शुल्कवाढ करण्यात आली नाही. गेल्या 13 वर्षांपासून पारंपरिक अभ्यासक्रमांच्या शुल्कात वाढ करण्यात आली नाही.
– डॉ. सुधाकर जाधवर, व्यवस्थापन परिषद सदस्य
अभ्यासक्रमांचे शुल्क कायम
कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या अभ्यासक्रमांच्या शिक्षण शुल्कात कोणतेही कपात करण्यात आली नाही. मात्र, अन्य सुविधांची वापर केला जात नाही, त्याचे शुल्क निम्म्याने कमी करण्यात आला. तसेच जी महाविद्यालये ऑनलाइन उपक्रम राबवतील त्यांना 50 टक्के शुल्क घेता येईल, तर उपक्रम न राबवणाऱ्या महाविद्यालयांना शुल्क आकारता येणार नाही. विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊ लागल्यावरच वसतिगृह शुल्क लागू होईल, असेही विद्यापीठाने म्हटले आहे.