पुणे – महापालिकेच्या मिळकतकराची थकबाकी न भरल्याने मिळकत सील करण्यासाठी आलेल्या पथकाला अनेक मिळकतधारक धनादेश देऊन कारवाई टाळतात. मात्र, जे धनादेश दिले जातात, अशा अनेक खात्यांमध्ये पैसेच नसल्याने अथवा चुकीच्या सहीमुळे ते वटत नाहीत म्हणजेच बाऊंस होतात. काही मिळकतधारकांच्या बाबतीत वारंवार हे प्रकार घडत आहेत. त्यामुळे महापालिकेने अशा मिळकतधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
वारंवार चुकीचे अथवा खात्यात रक्कम नसतानाही धनादेश देणाऱ्या १४७ मिळकतधारकांना कलम १३८ अन्वये नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नोटीसनंतर मिळकतकराची थकबाकी न भरल्यास या मिळकतधारकांना दोन वर्षांपर्यंत तुरूंगवास भोगण्याची वेळ ओढावण्याची शक्यता आहे. महापालिकेकडे दरवर्षी जमा होणाऱ्या एकूण मिळकतकराच्या रकमेत धनादेशाद्वारे भरण्यात येणाऱ्या रकमेचा वाटा सरासरी १८ ते २० टक्के आहे.
धनादेश न वटल्यास काय ?
धनादेश न वटल्यास चेक देणाऱ्या व्यक्तीला त्याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर त्याला एक महिन्याच्या त्याने पैसे देणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास त्या व्यक्तीला कायदेशीर नोटीस पाठवली जाते. त्यानंतरही १५ दिवसांत उत्तर न दिल्यास कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येतो. संबंधित धनादेश काढणाऱ्या व्यक्तीला दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
१४७ जणांना नोटीस
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दि. १ एप्रिल ते ३१ जुलै २०२४ अखेर महापालिकेस थकबाकी वसुलीपोटी १,९६८ धनादेश मिळाले आहेत. या धनादेशांची एकूण रक्कम ८ कोटी ३३ लाख ९३ हजार ८४३ रुपये असून, त्यापैकी न वटलेल्या १,२९२ धनादेशाची रक्कम ४ कोटी ५७ लाख ३५ हजार ३१७ इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. त्यातील वारंवार बाऊंस होणाऱ्या १४७ मिळकतींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांची थकबाकी सुमारे २ कोटी ३९ लाख रुपये इतकी आहे.
“जप्तीची कारवाई टाळण्यासाठी अनेकजण धनादेश देत आहेत. मात्र, प्रत्यक्षात बॅंकेत पैसे नसणे, चुकीची सही करणे, धनादेशात जाणीवपूर्वक चूक करणे असे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे थेट कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.” – माधव जगताप, उपायुक्त, कर संकलन विभाग, मनपा.