वडगावशेरी –महापालिकेत समावेश झाल्यांतर प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी कारभार हाती घेतला आहे. मिळकत कराची वसुलीही सुरू झाली आहे. यामध्ये पाणीपट्टीसह आरोग्य कराचाही समावेश आहे, हे मिळकत ग्रामपंचायतींपेक्षा अधिक आहेत. विशेष म्हणजे आरोग्य कर भरत असताना लोहगाव, खराडी, वाघोली या परिसरातून कचरा व्यवस्थापनाकरीता कचर वेचकांकडून महिन्याला घरटी 70 रुपये घेतले जात आहेत. या परिसरातील घरांची, सोसायट्यांचा संख्या लक्षात घेता कचरा वेचकांकडून गोळा होणाऱ्या रकमेचा आकड कोट्यवधींवर जाऊ शकतो. हा भार नागरिकांवर कशासाठी? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
महापालिकेत समावेशानंतर संबंधीत गावांतून मिळकतर वसुली सुरू करण्यात आली आहे. त्यातच कचरा वेचकांचा वाढीव खर्चही नागरिकांच्या माथी मारण्यात आला आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. लोहगाव, वाघोली या ग्रामपंचायती महसुलाच्या दृष्टीकोणातून मोठ्या मानल्या जातात. या ग्रामपंचायतींकडे कचरा व्यवस्थापनाची स्वतंत्र यंत्रणा होती, यासाठी टेम्पो, घंटागाड्या यासह अन्य साधने होती. मात्र, या गावांचा समावेश पालिकेत झाल्यानंतर या यंत्रणेशी संबंधीत वाहने महापालिकेने ताब्यात घेतली. तर, या गावांत खासगी संस्थेच्या माध्यमातून कचरा वेचकांद्वारे स्वच्छतेचे काम केले जात आहे. यातून महिन्याला 70 रुपयांचा वाढीव खर्च नागरिकांकडूनच वसूल केला जात आहे. मिळकत कर भरत असताना कचरा उचलण्याचा भार आमच्यावर कशासाठी? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
हॉटेल चालकही त्रस्त…
वाघोली परिसरात किमान 200 ते 250 हॉटेल आहेत. हॉटेलांतून शेकडो टन ओला कचरा दररोज गोळा होतो. पालिका कर्मचारी अशा हॉटेलांकडून महिन्याला अडीच ते तीन हजार रुपये वसुल करीत असून बहुतांशी कर्मचारी हॉटेल चालकांकडून हवे तेंव्हा दुपारी, संध्याकाळी आणि रात्री जेवणासाठ येत असतात. त्यामुळे हॉटेल चालकही अशा कचरा व्यवस्थापनाला आणि कर्मचाऱ्यांच्या “पाहुणचाराला’ कंटाळले आहेत.
श्री वाघेशर मंदिर हे केवळ या भागातील नव्हे तर जिल्ह्यातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. मात्र, येथील कचरा उचलण्यासाठी प्रशासनाच्यावतीने टाळाटाळ केली जाते. हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाने संबंधीत अधिकाऱ्याच्या निलंबनाची कारवाई केली. मात्र, ही मलमपट्टी असून प्रशासनाने अशा अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे.
– राजेंद्र सातव पाटील, अध्यक्ष, वाघेश्वर विकास प्रतिष्ठान, वाघोली
प्रशासनाची ही भूमिका अन्यायकारक आहे. त्याविरोधात वाघोलीचे सर्व नेते आणि नागरिक संघटीत होणार आहेत, याची जाणीव प्रशासनाने ठेवावी. प्रशासन अशा पद्धतीने वागत असेल तर प्रशासनाला आम्ही धडा शिकविण्यासाठी सज्ज असून त्याची दिशा ठरविण्यासाठी लवकरच सर्वपक्षीय नेत्याशी चर्चा करण्यात येणार आहे.
– बाळासाहेब सातव पाटील, शहर उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस