पुणे – बेशिस्तांवर कारवाईसाठी “हायड्रोलिक टोईंग क्रेन’

पुणे – पुणे वाहतूक विभागामध्ये नुकत्याच 6 “हायड्रोलिक टोईंग क्रेन’ दाखल झाल्या आहेत. या क्रेनमुळे वाहतूक पोलिसांचे काम सोपे होणार आहे.

शहरामधील पार्किंग समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिक रस्त्याच्या बाजूला परवानगी नसताना वाहन “पार्क’ करतात. पर्यायाने वाहतूक कोंडी निर्माण होते. बेशिस्त पद्धतीने लावलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करत वाहने जप्त करतात. क्रेनच्या आधाराने वाहने उचलताना अनेकदा वाहनांचे नुकसान होते. त्याचबरोबर कर्मचारी आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होतात. यावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक विभागामध्ये “हायड्रोलिक टोईंग क्रेन’ दाखल झाल्या आहेत. या नव्या टोईंग क्रेनमुळे वाहनांचे नुकसान कमी होण्यास मदत होणार आहे. नव्याने दाखल झालेल्या 6 टोईंग क्रेनपैकी 5 “नो पार्किंग’मधील दुचाकींसाठी, तर 1 क्रेन चारचाकी वाहनांवर कारवाईसाठी वापरण्यात येणार आहे. या क्रेनवर चालकासह दोन कर्मचारी नेमून देण्यात येणार आहेत.

नव्याने दाखल झालेल्या क्रेनमुळे वाहतूक पोलिसांचा त्रास कमी होणार आहे. मात्र, क्रेनचा भुर्दंड वाहनचालकांना पडणार आहे. यांत्रिक पद्धतीने वाहन उचलणाऱ्या क्रेनमुळे दुचाकीसाठी नो-पार्किंग दंड 200 रुपये, टोईंग चार्जेस 200 रुपये, जीएसटी 36 रुपये असे एकूण 436 रुपये भरावे लागणार आहेत. तर चारचाकीसाठी नो-पार्किंग दंड 200 रुपये, टोईंग चार्जेस 400, जीएसटी 72 रुपये असे एकूण 672 रुपये भरावे लागणार आहेत.

गोखले रस्त्यावर वाहनांवर कारवाई
वाहतूक विभागाच्या ताफ्यामध्ये दाखल झालेल्या “हायड्रोलिक टोईंग क्रेन’ कारवाईसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. डेक्कन विभागामध्ये क्रेन दाखल झाल्या आहेत. या क्रेनने गोखले रस्त्यावर (एफसी रोड) “नो-पार्किंग’मध्ये असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या टोईंग क्रेनमुळे वाहतूक पोलीसांचे आणि टोईंगच्या कर्मचाऱ्यांचे काम सोपे होण्यास मदत होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)