पुणे : हाय सीक्युरीटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवायची, मात्र रजीस्ट्रेशन दुसऱ्या जिल्ह्यातले आणि राहतो पुण्यात अशा व्यक्तींना आता दिलासा मिळाला आहे. शिक्षण, नोकरी आणि उद्याेग व्यवसायानिमित्त पुण्यात वास्तव्यास असलेल्या या वाहनधारकांना आता पुण्यातच उच्च सुरक्षा पाटी उपलब्ध हाेणार आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे फीटमेंट सेंटर वाढवा, सोसायटी, कंपनी अथवा एकाच ठिकाणी २५ पेक्षा जास्त नोंदणी असलेल्या वाहनांना होम डिलिव्हरी शुल्क घेऊ नका, अशा सूचना आरटीओकडून रोझमार्टा कंपनीला देण्यात आल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनांना ‘उच्च सुरक्षा पाटी’ लावण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. त्यासाठी परिवहन विभागाने वाहनधारकांना ३० एप्रिल २०२५ पर्यंतची मुदत दिली आहे. राज्यभरातील नागरिक पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांची वाहने इतर शहरांमध्ये नोंदणी केलेली असल्याने त्यांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) लावण्यास अडचणी येत हाेत्या. ही गैरसाेय दूर करण्यासाठी पुण्यात सेंटर वाढविण्यात येणार आहेत. वाहनधारकांना त्यानुसार एचएसआरपी नोंदणी करताना पुणे सेंटर निवडून हा लाभ घेता येणार आहे.
देशातील सर्व वाहन उत्पादक कंपन्यांनाकडून १ एप्रिल २०१९ पासून सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबरप्लेट लावल्या जातात. मात्र, आता २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. पुण्यात जवळपास २५ लाख वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्यात येणार आहे. सध्या पुण्यात १२५ फीटमेंट सेंटर सुरू आहेत. पण, ती वाहन संख्येच्या दृष्टीने पुरेशी नाहीत. त्यामुळे फिटमेंट सेंटर वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, काही फीटमेंटचालक वाहनधारकांना कोणतीही पूर्वसूचना न देता, फीटमेंट सेंटर बंद करत आहेत. यामुळे ज्येष्ठांना हेलपाटे मारावे लागत असून, हा प्रकार थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.
वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे पुण्यात फीटमेंट सेंटर वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. बाहेरच्या शहरात नोंदणी असलेल्या वाहनांनाही आता पुण्यात एचएसआरपी बसविता येणार आहे. यासाठी वाहनधारकांनी नोंदणी करताना पुण्याचे सेंटर निवडावे.
– स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी