पुणे – शहरातील खासगी रुग्णालयांच्या परवाना नूतनीकरण महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे येत्या 15 दिवसांतच सुरू केले जाणार आहे. ते ऑनलाइन पद्धतीने असेल. दर तीन वर्षांनी ही प्रक्रिया करण्यात येते. याशिवाय बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठीची शुल्क वसुलीही ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे.
पूर्वी कागदपत्रांच्या तपासणी प्रक्रियेसाठी सुमारे 21 दिवस लागायचे आणि या व्यतिरिक्त प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी केली जात असे. त्यामुळे नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण होण्याला सुमारे एक महिना लागत असे. आता ऑनलाइन प्रक्रियेमुळे कागदपत्र तपासणीचे काम एका आठवड्याने कमी होईल, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी दिली. ऑनलाइन परवाना नूतनीकरण प्रक्रियेमुळे निश्चितपणे अधिक पारदर्शकता येईल. रुग्णालयांना त्यांच्या परवान्यांच्या नूतनीकरणाची नियमित प्रक्रिया सुलभतेने करणे सोपे होईल, असे मनपा आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.
अशी असेल प्रक्रिया
*महापालिकेच्या वेबसाइटवर अर्ज अपलोड होतील.
*सर्व कागदपत्रांसह अर्ज मंजुरीसाठी आला, की क्षेत्रीय कार्यालय वैद्यकीय अधिकारी कागदपत्र पडताळतील.
*प्राथमिक तपासणीनंतर पुन्हा सहायक आरोग्य अधिकारी कागदपत्र तपासतील.
*त्यानंतर मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे अंतिम पडताळणी होऊन परवाना नूतनीकरण होईल.
पुणे मनपा हद्दीत लहान नर्सिंग होम आणि प्रसूती गृहांसह सुमारे 742 रुग्णालये आहेत. ज्यांना या प्रक्रियेचा फायदा होईल. या प्रक्रियेमुळे वॉर्ड आणि झोन स्तरावरील भ्रष्टाचार निश्चितपणे कमी होईल. याशिवाय बायोमेडिकल वेस्टसाठीही ऑनलाइन पेमेंट पद्धतीने पैसे देण्याची व्यवस्था करण्यात आली ही स्वागतार्ह बाब आहे. आजपर्यंत धनादेशाद्वारे किंवा रोखीनेच हे व्यवहार केले जात होते.
– डॉ. संजय पाटील, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, पुणे चॅप्टर