पुणे – घरमालकांनो, तुमच्या भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्या

12 जूनपर्यंत मुदत : सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाचे आदेश

पुणे – दहशतवादी कारवाया आणि गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यावर त्याची तात्काळ उकल होण्यासाठी घरमालकांनी घर भाड्याने देताना भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनमध्ये देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. 12 जूनपर्यंत ही घरमालकांनी पोलीस स्टेशनमध्ये जमा करणे आवश्‍यक असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहेत.

शहरात झालेला बॉम्बस्फोटांच्या घटना, तसेच पुणे परिसरातून तसेच तळेगाव दाभाडे आणि चाकण परिसरातून भाडेकरू म्हणून राहणाऱ्या नक्षल आणि माओवादी संघटनेच्या सदस्यांना अटक करण्यात आलेली आहे. या घटनांचा विचार करता भविष्यातील घातपाती कारवायांवर वेळीच प्रतिबंध करणे शक्‍य होईल, यासाठी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या लोकांची माहिती पोलीस स्टेशनला असणे आवश्‍यक आहे. यापार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील नगरपंचायत, ग्रामपंचायत, कॅन्टोन्मेंट बोर्ड आदी हद्दीमध्ये राहणाऱ्या मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडील घर, दुकाने, सदनिका, फार्म हाऊस भाडेतत्त्वावर देणे, पोट-भाडेकरू ठेवणे किंवा विक्री केल्यास विकत घेणाऱ्यांची आदी माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात 7 दिवसांच्या आत कळविणे बंधनकारक आहे. मात्र, अजूनही या नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

ग्रामीण भागाचा विचार करता शहरालगत असलेल्या हवेली, लोणीकंद, लोणीकाळभोर, लोणीकंद, चाकण, खेड, शिक्रापूर, आळंदी, तळेगाव दाभाडे, राजगड, पौड, लोणावळा, शिरुर, रांजणगाव तसेच ज्या-ज्या ठिकाणी औद्योगिक वसाहती व फार्म हाऊस आहेत त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात परप्रांतिय नागरिक नोकरी व इतर कामानिमित्त येऊन भाड्याने घर घेऊन राहत आहेत. परंतू याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात येत नाही. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घरमालकांनी भाडेकरुंची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्याचे आदेश जारी केले आहेत. यामुळे दहशतवादी व गुन्हेगारी कारवाया आटोक्‍यात आणण्यास मदत होणार आहे.

…ही कागदपत्रे आवश्‍यक
घरमालकांनी त्यांचे घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरुचे संपूर्ण नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन फोटो, त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तींचे नाव पत्ता, घरभाडे करारनामा, ओळखपत्र आदी कागदपत्रे प्राप्त करून पोलीस स्टेशनकडे जमा करणे बंधनकारक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.