पुणे : अपघातात मृत्यू झालेल्या आयटी इंजिनिअरच्या कुटुंबाला दावा दाखल केल्यापासून एक वर्षाच्या आत न्याय मिळाला आहे. कुटुबियांना २ कोटी ४४ लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. शनिवारी (दि.२२) झालेल्या लोकअदालतमध्ये तडजोडीअंती दावा निकाली निघाला. मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.पी.क्षीरसागर आणि अॅड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनल पुढे हा दावा निकाली निघाला.
इंजिनिअर विनायक दिलीप भगत (वय ३३) दि. ४ फेबुवारी २०२४ मध्ये दुचाकीवरुन पुण्याकडून सिंहगड येथे चालला होता. तो गाडी चालवित होता, तर मित्र पाठीमागे बसला होता. त्याला खडकवासला धरणाजवळ समोरून रॉंग साइडने आलेल्या टेम्पोने धडक दिली.
अपघातानंतर उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्याची पत्नी, आई, बहिण आणि दोन भाचे यांनी धडक दिलेल्या टेम्पोची विमा कंपनी असलेल्या चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता. दि. १९ एप्रिल २०२४ला येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे हा दावा दाखल करण्यात आला.
इंजिनिअरला दरमहा १ लाख ६७ हजार ३३३ रुपये पगार होता. त्याचे वय, पगार, असलेल्या अवलंबत्वाचा विचार करून २ कोटी ८५ लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली. मात्र, तडजोडी अंती २ कोटी ४४ लाख रुपये नुकसान भरपाई देत दावा निकाली काढण्यात आला. अर्जदारातर्फे अॅड. संजय राऊत आणि अॅड. अनिता राऊत यांनी काम पाहिले. तर विमा कंपनीचे कायदेशीर सल्लागार अॅड. शाम माहेश्वरी यांनी तडजोडीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली.