पुणे : राज्य शासनाने हॉटेल, रिसॉर्ट आणि ॲम्युजमेन्ट पार्कसाठी बांधकाम नियमावलीमध्ये काही सवलती दिल्या आहेत. यामध्ये रस्ता रूंदीनुसार मान्य “एफएसआय’ व्यतिरिक्त पाच पर्यंत “एफएसआय’ वापरून बांधकामास करण्यास परवानगी मिळणार आहे. या निर्णयामुळे पुणे शहरात उंचच उंच हॉटेल उभारता येणार आहे.
राज्य सरकारकडून नुकतेच राज्य पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्याचा समावेश एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहनपर नियमावलीत (युडीपीसीआर) करण्यात आला आहे. त्यामध्ये पर्यटनाला चालना मिळावी, त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी १२ मीटर रुंदीच्या रस्त्यावर तीन, अठरा मीटर रुंदीच्या रस्त्यावर साडेतीन, तर २७ मीटर रुंदीच्या रस्त्यावर चारपर्यंत “एफएसआय’ वापरून बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे.
तसेच रेडी रेकनरमधील दराच्या साठ टक्के शुल्क आकारून एकूण “एफएसआय’च्या साठ टक्के “अॅंन्सलरी एफएसआय’ वापरण्यास ही परवानगी दिली आहे. याशिवाय बांधकाम विकसन शुल्क टप्याटप्प्याने भरण्याची सवलतही देण्यात आली आहे.
यापूर्वी हॉटेल, रिसॉर्ट अथवा ॲम्युजमेन्ट पार्क उभारताना मान्य “एफएसआय’ व्यतिरिक्त जादा “एफएसआय’ वापरून बांधकाम करण्यास राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागत असे. या नियमांचा समावेश “यूडीसीपीआर’मध्ये केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर त्यास मान्यता मिळणार आहे.