पुणे – जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत व्यापाऱ्यांशी संबंधित जीएसटीच्या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी पाठपुरावा करू आणि व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी दिले.
कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार रासने यांना पुण्याच्या मध्यवस्तीतील तुळशीबाग मंडई, लक्ष्मी रस्ता, भोवरी आळी, रविवार पेठ, टिंबर मार्केट या मुख्य बाजारपेठांतील व्यापाऱ्यांनी आज मेळावा घेऊन पाठिंबा दिला. त्या वेळी ते बोलत होते.
राजेंद्र काकडे, नितीन पंडित, उमेश शहा, किशोर लोढा, दिनेश अमर शहा, संजय मनोज, पंकज साखरी, मनीष परदेशी, संजीव फडतरे, नयन ठाकूर, वैभव लोढा, हरीश शेट्टी, गणपत जय हिंद, सुनील इनामदार, मनीष जाधव, संजीव मंचे, नितीन चिल्का, अमित मनोज, भारत लढे, विनायक कदम, किरण चौहान यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रासने म्हणाले, की पुणे ही राज्यातील एक प्रमुख बाजारपेठ असून, कसबा मतदारसंघात सर्वाधिक बाजारपेठा आहेत. या परिसरातील व्यापाऱ्यांचे विविध प्रश्न राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत, तसेच जीएसटीसंदर्भातील मागण्या केंद्र शासनाकडे प्रलंबित आहेत. केंद्रात आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून व्यापाऱ्यांचे प्रश्न केंद्र शासनाकडे तातडीने सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
“मध्यवर्ती भागात वर्षभर ग्राहकांची गर्दी असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या भागासाठी उपलब्ध जागांवर विस्तारित पार्किंग उभारण्यास प्राधान्य देणार आहे. बाजारपेठ परिसरात व्यापारी व महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणेची व्याप्ती वाढविण्यावर आपला भर असणार आहे.” – हेमंत रासने, भाजप, महायुती उमेदवार