पुणे – घाटमाथ्यावरील पावसाने खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी येत आहे. परिणामी, अवघ्या दोन दिवसांत धरणसाखळीत पाऊण टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. आता एकूण पाणीसाठा ५.८७ टीएमसी झाला आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाचा जोर वाढला आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी जोरदार पाऊस होत असून धरणात पाण्याचा येवा वाढला आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात ४.९९ टीएमसी पाणीसाठा होता. तो शनिवारी सकाळी ५.६५, तर सायकांळी ५.८७ टीएमसी होता. हे पाणी शहराला चार महिने पुरेल एवढे आहे. सध्या खडकवासला धरणात ०.९५, पानशेत-२.८१, वरसगाव-१.६६ तर टेमघर धरणात ०.४४ टीएमसी पाणी आहे.
टेमघरमध्ये सर्वाधिक पाऊस
या चारही धरणांमध्ये जून जवळपास कोरडा गेला असला, तरी जुलैमध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाला आहे. सर्वांत कमी पाऊस खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाला आहे. मात्र, पानशेत आणि वरसगाव धरणात कमी पाऊस असला, तरी मोसे खोऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे पानशेत धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
असा आहे धरणातील पाऊस
धरण……. – जूनमधील पाऊस – (दि.१ ते ६ जुलै सायंकाळपर्यंत पाऊस)
खडकवासला – १४० मिमी – २४ मिमी
पानशेत – २०५ मिमी – २४७ मिमी
वरसगाव २१० मिमी – २४४ मिमी
टेमघर – ३४६ मिमी – ४५२ मिमी