पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे, खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांचा एकूण पाणीसाठा २७.१४ टीएमसी ( ९३ टक्के) झाला आहे. तर या चारही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असून आता पर्यंत मुठा नदीतून सुमारे १०.८४ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.
तर खडकवासला धरणातून मुठा नदीत २७ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत हा पाणीसाठा ३ टीएमसीने अधिक आहे. मागील वर्षी याच दिवशी या चारही धरणातील पाणीसाठा २४.२२ टीएमसी होता.
पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिवसभरात खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८ मिमी पाऊस झाला असून पानशेत पाणलोट क्षेत्रात ४५ मिमी, वरसगाव पाणलोट क्षेत्रात ४९ मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, घाटमाथ्यावर मोठया प्रमाणात पाऊस होत असल्याने धरणांमध्ये मोठया प्रमाणात पाण्याचा येवा असल्याने पाणीसाठयात झपाटयाने वाढ होत असल्याने मुठा नदीत मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे.
महिन्याभरातच भरली धरणे
या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जून महिना जवळपास कोरडाच गेला होता. या पाणलोट क्षेत्रात २५ जून पासून पावसाला सुरूवात झाली या दिवशी या धरणांमध्ये ३.४१ टीएमसी पाणीसाठा होता. त्यानंतर २८ जून पासून प्रत्यक्षात पाणी वाढण्यास सुरूवात झाली.
त्यानंतर पूर्ण जुलै महिना या पाणलोट क्षेत्रात मुसळाधार पाऊस झाल्याने गेल्या महिन्याभरात पावसामुळे तब्बल ३४ टीएमसी पाणी जमा झाले आहे. त्यातील २७ टीएमसी पाणी धरणात असून आता पर्यंत १० टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे यंदा पहिल्यांचा एकाच महिन्यात एवढा मोठा पाऊस झाला आहे. त्यातच आता पावसाचे आणखी दोन महिने शिल्लक असल्याने मोठया प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे.