औंध/कोथरूड – विधानसभा निवडणुकीनंतर अद्यापही शुभेच्छांचा फ्लेक्स फिव्हर कायम असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हडपसर, कात्रज, धनकवडी, औंध या भागासह सर्वाधिक फ्लेक्स कोथरूड, वारजे आणि शिवाजीनगर परिसरात आढळून आले आहेत. अशा अनधिकृत फ्लेक्समुळे या परिसराचे विद्रूपीकरण झाले आहेत.
जागा मिळेल त्या ठिकाणी असे फ्लेक्स लावण्यात येत असल्याने स्थानिक नागरिकांच्या डोक्याला ताप झाला आहे. विशेष म्हणजे काही लाकडी फ्लेक्स फाटले असून काही रस्त्यावर लटकू लागले आहेत. महापालिकेच्या आकश चिन्ह विभागाने या परिसरात कारवाई मोहिम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आता महापालिकेची निवडणुकीचे वेध नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार तसेचस पदाधिकारी, कायकर्त्यांना लागले आहेत. त्यामुळे आपल्या मतदारसंघात निवडून आलेल्या आमदारांना खूश करण्यासाठी चौका-चौकात फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत.
आता, निकाल लागून आठ दिवस झाल्यानंतरही असे फ्लेक्स झळकत आहेत. याकडे आकाशचिन्ह विभागाचे दुर्लक्ष असल्याचे परिसरातील अनेक ठिकाणी विद्रुपीकरण झाले आहे. अनधिकृतपणे फ्लेक्स लावणारे ठेकेदार लाकडाचा सांगडा बांधून जागा अडवून ठेवतात. कित्येक दिवस असे लाकडी सांगडे तसेच असतात. महापालिका आकाशचिन्ह विभागाचे कर्मचारी अशा ठिकाणी कारवाई करण्यात कुचराई करीत आहेत.
कोथरूडमधील फ्लेक्सची ठिकाणे : कर्वे पुरळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पौड रस्ता, आनंद नगर भाजी मंडई, कोथरूड पोलीस स्टेशन, अशिष गार्डन, पौड फाटा, परमाहंस नागर, गुजरात कॅालनी, महात्मा सोसायटी परिसर, कर्वेनगर परिसर.
शिवाजीनगरमधील फ्लेक्सची ठिकाणे : गोपाळकृष्ण गोखले रस्ता, कुसाळकर पुतळा जनवाडी, पत्रकार नगर, शिवाजीनगर गावठाण, वेताळबाबा चौक, सेनापती बापट रस्ता, मॅाडेल कॅालनी परिसर, आंबेडकर चौक बोपोडी, दीप बंगला चौक वडारवाडी, पुणे विद्यापीठ चौक, खडकी बाजार, स्पायसर चौक
औंधमधील फ्लेक्सची ठिकाणे : बाणेर फाटा, दसरा चौक, परिहार चौक, ब्रेमेन चौक
हडपसरमधील फ्लेक्सची ठिकाणे : भाजमंडइ, गाडीतळ बसस्थानक, रवि दर्शन चौक, पंधरा नंबर चौक, आण्णासाहेब मगर कालेज चौक, शेवाळेवाडी चौक
“विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर तसेच उपनगरांत अनेक ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. कोथरूड, शिवाजीनगरमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. कर्मचारी कामावर रूजू होत असल्याने आता कार्यवाही सुरू केली आहे. दिवसभरात ३० ते ३५ फ्लेक्स काढण्यात येत आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत सगळे फ्लेक्स काढण्यात येतील.” – निलेश घोलप, आकाशचिन्ह परवाना निरीक्षक.