पुणे -‘कर सहायक’ परीक्षेत हर्षल भामरे, कल्पना मुंडे प्रथम

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र गट-ब सेवा मुख्य परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील हर्षल भामरे हे राज्यातून व मागासवर्गीयातून प्रथम आले आहेत. तर महिलांमध्ये बीड जिल्ह्यातील कल्पना मुंडे या प्रथम आल्या आहेत.

आयोगातर्फे महाराष्ट्र गट-ब क सेवा मुख्य परीक्षेमधील “कर सहायक’ या सवंर्गातील एकूण 478 पदांसाठी दि. 14 ऑक्‍टोबर 2018 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. शिफारसपात्र उमदेवारांची पात्रता शासन स्तरावर, मूळ प्रमाणपत्र आधारे तपासण्याच्या अटींच्या अधीन राहून आज निकाल आयोगाने जाहीर केला.

दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या पदावर शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांनी नव्या संगणक प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेल्या विकलांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तसेच खेळांडूचा दावा केलेल्या उमेदवारांनी संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालकांचा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीबाबतचा अहवाल नियुक्‍तीपूर्वी शासनाकडे सादर करणे आवश्‍यक आहे.

या परीक्षेत ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी गुणपत्रके प्रोफाइलमध्ये पाठविल्याच्या तारखेपासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्‍यक आहे. हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.