पुणे – पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कामकाजाची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी व विविध प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार शिक्षण आयुक्तालयातील शिक्षण उपसंचालक हारून आतार यांना सोपविला आहे.
दैनिक प्रभातच्या ८ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या अंकात फायलींवरील धूळ निघता निघेना, असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दखल घेतली आहे. सहसंचालक डॉ. दिलीप जगदाळे यांनी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला भेट देऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन शिक्षण आयुक्तांकडे वस्तुस्थितीचा अहवाल सादर केला. त्यानुसार शिक्षण आयुक्तांनी कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रशासकीय कारणास्तव डॉ. वंदना वाहूळ यांच्याकडील उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार संपुष्टात आणण्यात आल्याचे आदेशही जारी केले आहेत. उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार शिक्षण आयुक्तालयातील शिक्षण उपसंचालक हारून आतार यांच्याकडे सुपूर्द करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे आतार यांना कारभारात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांची पदोन्नतीने मुंबई बोर्डाच्या विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातील शिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविला होता.
शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी, संच मान्यता, सांकेतांक क्रमांक, अनुदान, वैद्यकीय बिले, विषय मान्यता, तुकडी मान्यता, दर्जावाढ यासह अन्य प्रकरणे सेवा हमी कायद्यानुसार मुदतीत मार्गी लागत नसल्याची बाब उघडकीस आली होती. माहिती अधिकार कायद्याअंतर्गतच्या प्रकरणांची माहितीही लवकर दिली जात नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्याची दखल घेत शिक्षण आयुक्तांनी आतार यांच्याकडे कार्यभार सोपविला आहे.