पुणे – तरुण पिढी रील आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवते; पण वास्तविक जीवनात प्रगतीसाठी मेहनत आणि परिश्रम महत्त्वाचे आहेत, असा सल्ला प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी विद्यार्थ्यांना दिला.
व्हीआयटी कॉलेजमध्ये अभिनेते दामले यांचा मुक्त संवाद या सत्रासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला आणि आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना कलेसाठी परिश्रम घेण्याचे महत्त्व सांगितले.
कॉलेजचे दिवस म्हणजे आपल्याला नक्की काय येऊ शकते आणि काय नाही, हे जाणून घेण्याचे दिवस आहेत, असे ते आवर्जून म्हणाले. कला ही फक्त अभिनयावर आधारित नसून, त्यात समर्पण, मेहनत आणि वेळेचे नियोजन महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांना वेळेचा सदुपयोग कसा करावा, याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांच्या नाटकातील गाण्याच्या संदर्भात सुख म्हणजे नक्की काय असते? हा प्रश्न विचारला. दामले यांनी ते गाणे गायले आणि नंतर उत्तर दिले, माझ्यासाठी सुख म्हणजे आपल्याला दिलेले काम उत्कृष्ट रीतीने पार पडणे. याशिवाय दुसरे सुख नाही. कार्यक्रमाचा समारोप त्यांनी गझल रंजीश ही सही सादर करून केला.