पुणे : साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त असलेला गुढी पाडवा रविवारी (दि.३०) आहे. या दिवशी आवर्जून हापूस आंब्याचा आस्वाद घेतला जातो. मात्र, यावर्षी वातावरणातील बदलामुळे नेहमीच्या तुलनेत अवघा ३० ते ४० टक्के माल मार्केट यार्डातील फळ बाजारात येत आहे. त्यामुळे भाव वाढले असून, सध्यातरी आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर दिसत आहे. मागील वर्षी ५०० ते ७०० रुपये डझन भाव मिळणाऱ्या आंब्याला आता १००० ते १८०० रुपये मोजावे लागत आहेत.
कोकणातून मागील वर्षी पाडव्याच्या वेळी दररोज ५ ते ६ हजार पेटीची आवक होत होती. ती आता १ ते २ हजार पेट्यापर्यंत कमी होत आहे. लांबलेला पाऊस, कमी पडलेली थंडी आणि आता वाढलेल्या तापमानामुळे आंब्याचा पहिला मोहोर गळाला आहे. परिणामी, उत्पादन घटल्याने आवक कमी होत आहे. त्यातच पाडव्यामुळे पुढील ४ ते ५ दिवस मागणी जास्त असणार आहे. त्यामुळे भाव चढेच राहण्याचा अंदाज व्यापारी युवराज काची आणि अरविंद मोरे यांनी वर्तविला आहे. सध्या बाजारात कच्चा मालाच्या ४ ते ६ डझनाच्या पेटीला दर्जानुसार ३ ते ५ रुपये आणि ५ ते ८ डझनाच्या पेटीला दर्जानुसार ४ ते ८ हजार रुपये भाव मिळत आहे.
सध्या आंब्याची कमी आवक होत आहे. १० एप्रिल ते १० मे या कालावधीत आवक वाढेल. त्यावेळी भावात घट होण्याची शक्यता आहे. दरवर्षी ३० जूनपर्यंत हंगाम असतो. मात्र, तो यंदा १ महिना आधीच संपण्याचा अंदाज आहे.
– युवराच काची, रत्नागिरी हापूसचे व्यापारी, मार्केट यार्डमागील काही वर्षांमध्ये गुढी पाडव्याला हापूसची आवक वाढत असते. मात्र, यंदा पहिल्यांदाच आवक कमी होत आहे. सध्या असलेली मागणी पाहता हापूसचे भाव चढेच राहणार आहेत.
– अरविंद मोरे, रत्नागिरी हापूसचे व्यापारी, मार्केट यार्ड
मागील वर्षी यावर्षी
दररोजची आवक ५ ते ६ हजार पेटी १ ते २ हजार पेटी
डझनाचा भाव ५०० ते ७०० रुपये १००० ते १८०० रुपये