पुणे : हापूस आला सर्वसामान्यांच्या आवाक्यात

बाजारात डझनाला 250 ते 700 रुपये भाव

पुणे – अक्षय तृतीयेला सर्वसामान्य नागरिकांना गोड हापुसची चव चाखता येणार आहे. मार्केटयार्डातील फळ विभागातील हापूस आंब्याची आवक वाढली आहे. दोन दिवसांवर आलेल्या अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंब्याला चांगली मागणी होत आहे. त्यातुलनेत, आवक जास्त असल्याने रत्नागिरी हापूसचे भाव उतरले आहेत. घाऊक बाजारात दर्जानुसार हापूसची 250 ते 700 रुपये डझनाने विक्री सुरू आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग भागातून हापूसची आवक होत आहे. सोमवारी (दि. 10) येथील बाजारात अडीच ते तीन हजार पेट्यांची आवक झाली. कच्च्या हापूसच्या 4 ते 6 डझनाच्या पेटीला 1 हजार ते 2 हजार 500 रुपये व 5 ते 10 डझनाच्या पेटीला 1 हजार 500 ते 4 हजार रुपये भाव मिळाला. तर, तयार हापूसची 1 हजार 500 ते 3 हजार व 5 ते 10 डझनाच्या पेटीची 2 ते 5 हजार रुपये भावाने विक्री झाली.

तर कर्नाटक हापुसचे व्यापारी रोहन उरसळ म्हणाले, करोनाच्या परिस्थितीमुळे बाजारात मंदी आहे. बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. मात्र, अपेक्षित मागणी नाही. करोनामुळे ग्रामीण भागात कडक नियम बनविण्यात आले आहेत. त्यामुळे तेथील व्यापारी कमी प्रमाणात माल खरेदी करत आहे. तरीही गेल्या वर्षी पेक्षा चांगली परिस्थिती आहे. बाजारात कर्नाटक हापूसच्या कच्च्या ४ डझनाच्या पेटीला ५०० ते ८०० रुपये भाव मिळत आहे. तयार मालास ८०० ते १५०० रुपये मोजावे लागत आहेत. सोमवारी (दि.१०) बाजारात २० ते २५ हजार पेटी आवक होत आहे.

रत्नागिरी हापूसचे व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, सध्यस्थितीत बाजारात दर्जेदार हापूस उपलब्ध होत आहे. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर हापूसला मागणी होत आहे.
करोनामुळे नागरीक यंदा काटकसर मोठ्या प्रमाणात करत आहे. त्यामुळे बाजारात हापूसला मागणी कमी आहे. त्यातुलनेत आवक जास्त असल्याने हापूसचे भाव एरवीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. बाजारात उपलब्ध असलेला आंबा दर्जेदार असून गोडीही अधिक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.