ठाकरेंच्या उपस्थितीत महाआरती, हनुमान चालिसा पठण
पुणे – भोंगे आणि लाऊडस्पीकर प्रकरण तापले असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते कुमठेकर रस्त्यालगतच्या खालकर चौक मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्यात आले. दरम्यान, ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधणे टाळले. तर, यावेळी राज यांनी परिधान केलेली “भगवी’ शाल सर्वांसाठीच “लक्ष्य’वेधी ठरल्याची चर्चा होती.
“भोंगा’ विषयावर आवाज उठवत लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा चालवण्याचा पवित्रा राज ठाकरे यांनी घेतला आहे. गुढीपाडव्याच्या सभेत त्यांनी तसे आक्रमकपणे मांडलेदेखील. त्यानंतर ठाण्यात झालेल्या “उत्तरसभेत’ ठाकरे यांनी प्रार्थनास्थळासमोरील भोंगे हटवण्यासाठी 3 मेपर्यंतचा वेळ सरकारला दिला. त्यावर महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी टीका सुरू केली. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यातच ठाकरे यांनी 16 एप्रिलला हनुमान जयंतीचे औचित्य साधत पुणे दौरा आयोजित केला. त्यानुसार हा कार्यक्रम झाला.
दरम्यान, कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी कार्यक्रमस्थळी तगडा पोलीस बंदोबस्त होता. कार्यक्रमास पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, शहर सरचिटणीस अजय शिंदे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.