पुणे – गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्याचे सुतळीने बांधले हात

जाब विचारल्याने शिक्षकास नोकरीवरून हटविले


घटनेची केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाकडून दखल

पुणे – गोंधळ घालणाऱ्या दुसरीतील विद्यार्थ्याचे हात सुतळीने बांधून त्याला शिक्षा दिल्याचा प्रकार कोंढाव्यातील एक नामांकित शाळेत उघडकीस आला आहे. या प्रकाराचा जाब विचारणाऱ्या शिक्षकासही शाळेने नोकरीवरून काढून टाकले आहे. दरम्यान, या घटनेची दखल केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने घेतली आहे. त्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

सहकारनगर येथे राहणाऱ्या अनिकेत सातव या 38 वर्षीय शिक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षक महिले विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोंढवा येथील मानसुखभाई कोठारी नॅशनल स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करीत होते. दि.1 नोव्हेंबर 2018 रोजी दुसरीतील विद्यार्थी खेळाच्या तासाला मैदानावार आले असता फिर्यादींना एका मुलाच्या हाताला सुतळी बांधलेली दिसून आली. त्याबाबत विचारणा केली असता वर्गशिक्षक महिलेने माझे हात बांधण्यास सांगितले आहेत, अशी माहिती त्याने दिली.

खेळाचा तास संपल्यावर फिर्यादी हे पुन्हा विद्यार्थ्यांच्या वर्गात गेले असता तेव्हाही त्या विद्यार्थ्याचे हात सुतळीने बांधलेलेच दिसून आले. फिर्यादिने मुलाचा मोबाइलमध्ये फोटो काढला, तसेच वर्गात हजर असलेल्या शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना त्याबाबत विचारणा केली. यावर मुलगा जास्त त्रास देत असल्याने त्याचे हात बांधले असल्याचे उत्तर दिले.

फिर्यादी यांनी घडलेल्या प्रकारची कोठेही वाच्यता करू नये, यासाठी शाळेच्या प्रशासनाने त्यांना कोणतेही कारण न देता काढून टाकले. दरम्यान, शिक्षकाने दि. 2 फेब्रुवारी 2019 रोजी याबाबत महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांना फोटोसह ई-मेल पाठविला होता. मंत्रालयाने सदर घटनेची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षनाचा अधिनियमचे कलम तसेच जे.जे.ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विष्णू वाडकर हे करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)