फुरसुंगी -हडपसर ते पंढरपूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम टप्याटप्याने सुरू करण्यात आले असून मुख्य रस्त्याचे डांबरीकरण आणि फुरसुंगी रेल्वे लाइनवर रेल्वे ओव्हर ब्रीज बांधण्यात येणार आहे. वडकी व उरळी देवाची रस्त्याच्या प्रवेशद्वाराजवळ अंडरपास आणि मंतरवाडी चौकात तसेच एसपी इन्फोसिटी सेंटरसमोर उड्डाणपूल (फ्लायओव्हर) उभारण्यात येणार असल्याने हा मार्ग वाहतुकीस सुरक्षित होणार आहे.
आळंदी-पढंरपूर पालखी मार्ग गेल्या 20 वर्षांपासून अधिक काळ केवळ राजकारण्यांच्या अडवा आणि जिरवा या धोरणात अडकला आहे, याबाबत “प्रभात’मध्ये वृत्त देण्यात आले होते. त्यानंतर याबाबत माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी पुढाकार घेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनानुसार सदर कामासाठी पाठपुरावा सुरू केल्याने त्याला यशही आले असून या मार्गावरील काही टप्यातील कामे सुरू करण्यात आली आहेत.
हडपसर ते लोणंद हा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग राज्य सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचआय) हस्तांतरित केल्यानंतर त्यांनी या कामाला मंजूरी दिली व त्यातील झेंडेवाडी (ता. पुरंदर) ते लोणंद या कामाची निविदा निघाल्यानंतर आता कामाला सुरूवात करण्यात आली आहे. हडपसर ते झेंडेवाडी हा मार्ग दिवे घाट भागातील भाग वनविभागाच्या हद्दीतील असल्याने वन विभागाची परवानगी नसल्याने या रस्त्याचे कमा रखडले होते. याबाबतच्या परवानगीसाठी शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे संभाजी झेंडे यांनी पाठपुरावा केला. यातून वनविभागाने परवानगी दिल्याने सदर मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे.
वनविभागाची परवानगी नसल्याने या मार्गाचे काम पूर्ण होत नव्हते. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, नितीन गडकरी तसचे सुप्रियाताई सुळे यांचे सहकार्य लाभले. ही प्रक्रिया खूप किचकट होती. परंतु, ती पूर्ण करता आली याचे समाधान आहे.
– संभाजीराव झेंडे, निवृत्त सनदी अधिकारी
पवार आणि गडकरी यांची एकत्रित भेट…
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे कार्यालयाकडून दिल्लीला निविदेसाठी आवश्यक कागदपत्रे गेली असून शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) संभाजी झेंडे यांनी शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एकत्रित भेट घेतली. या कामासंदर्भातील प्रक्रिया लवकर करण्याची विनंती केली होती. यावेळी गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यापूर्वी खासदार सुळे यांनी गडकरी यांना यबाबत पत्र लिहले होते.