कोंढवा – लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला हडपसर मतदारसंघात चांगले मताधिक्य मिळाल्याने आता हडपसर विधानसभा जिंकण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी रणशिंग फुंकले आहे, आगामी विधानसभा निवडणुकीत मशाल हाती घेवुन हडपसर जिंकण्याचा निर्धार महादेव बाबर यांनी केला आहे. मुंबई येथे झालेल्या पक्षाच्या बैठकित पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विधानसभेसाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्याचे बाबर यांनी सांगितले
कोंढवा येथे आयोजित पत्रकार परीषदेत बोलताना महादेव बाबर म्हणाले की, हडपसर मतादरसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. एखादं दुसरा अपवाद वगळता आजही सर्व सेनेचे निष्ठावंत पदाधिकारी, नगरसेवक व शिवसैनिक शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षांसोबत आहेत. आदेश मिळताच हाती मशाल घेऊन हडपसरचा गड सर केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. महाविकास आघाडीची वज्रमुठ लोकसभा निकालानंतर तर अधिकच घट्ट झाली आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहे, असे ठामपणे महादेव बाबर यांनी सांगितले.
आम्ही मोठ्या निष्ठेने महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिरुर लोकसभा निवडणुकीत डॅा. अमोल कोल्हे यांना हडपसर मतदारसंघातून
मताधिक्क्य देण्यात यशस्वी ठरलो आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी कामाला लागा, असे सांगितल्याची माहिती बाबर यांनी दिली. याप्रसंगी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अमोल हरपळे, युवासेना समन्वयक प्रसाद बाबर, सागर जगताप, अमर कामठे, महेंद्र भोजणे आदी उपस्थित होते.
महादेव बाबर म्हणाले की, कोणी काय केले यापेक्षा मी काय केले, हे महत्त्वाचे आहे. मागील दहा वर्षांपासून सत्तेत नसलो तरी सामान्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवित आहे. सत्ताधारी आमदारांनी हडपसरमधील वाहतूक कोंडी, कात्रज बाह्यवळण मार्ग, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रेंगाळत ठेवला आहे. जनतेला आता आश्वसने नको आहेत, काम हवे आहे, अशा भावना व्यक्त होत आहेत.
कष्टकरी कामगारवर्ग मोठ्या प्रमाणावर राज्य-पराज्यातून आला आहे, त्यांना सुरक्षितता हवी, जाती-पाती पलीकडे जाऊन सर्वधर्मीयांना सोबत घेऊन काम करणारा कार्यकर्ता, अशी ओळख निर्माण केली आहे. हडपसर विधानसभा मतदार संधात आगामी निवडणुकीत विजयाची मशाल पेटविण्याचा ठाम निर्धार बाबर यांनी केला आहे.