पुणे : शहरासह जिल्ह्यात गुईलेन बॅरे सिंड्रोम या नव्या विषाणूने शिरकाव केला असून, या विषाणूचे २४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुणेकरांची चिंता आणखी वाढली असून, हा विषाणू संसर्गजन्य नसून, उपचार घेऊन तो बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, पूना हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांमध्ये गुईलेन बॅरे सिंड्रोम या विषाणूची लक्षणे आढळून आली असून, हे रुग्ण सिंहगड रस्ता परिसरातील आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात ५, पिंपरी-चिंचवड परिसरात २, ग्रामीण भागात १६, तर जिल्ह्याबाहेरील १ अशा एकूण २४ संशयित रुग्णांचा समावेश आहे. त्यातील दहा रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल रुग्णांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच सर्व बाबी स्पष्ट होतील. वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले, की हा आजार कोणालाही होऊ शकतो. विशेषत: १२ ते ३० वयोगटांतील लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते. काही वेळा वयस्कर व्यक्तींनाही लागण झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, हा आजार धोकादायक नाही. त्यामुळे घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या विषाणूने पेरू देशात धुमाकूळ घातला आहे. तेथे आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार, गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. यामध्ये शरीरातील रोगप्रतिकार शक्ती मज्जातंतूवर हल्ला करू लागते. यामुळे स्नायूंमध्ये कमकुवतपणा येतो. वेदनाही होतात. चेहरा, डोळे, छाती शरीरातील स्नायूंवर परिणाम होतो. या आजारात कधी कधी अर्धांगवायूचा झटका येण्याचीही शक्यता असते. या आजाराचा फैलाव वेगाने होत असला, तरी रुग्ण लवकर बरेही होतात. मात्र, बरे होण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो.
आजाराची लक्षणे
– हातापायातील ताकद कमी होणे
– हातापायाला मुंग्या येणे
– गिळण्यास व बोलण्यास त्रास होणे
– धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे
विशेषत: १२ ते ३० या वयोगटातील लोकांना हा आजार होतो. पुण्यात जे संशयित रुग्ण सापडले आहेत, त्या रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे हा आजार संसर्गजन्य नाही. यासाठी वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागत नाही, तसेच आजार लवकर बरा होतो.
– डॉ. नीना बोराडे, आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
पुणे शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांतील रुग्णसंख्या
– दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल – १०
– पूना हॉस्पिटल हॉस्पिटल – ५
– काशीबाई नवले हॉस्पिटल – ४
– भारती हॉस्पिटल – ३
– सह्याद्री हॉस्पिटल – १
– अंकुरा हॉस्पिटल – १
एकूण – २४