शिरुर : लोकसभेपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्या दृष्टीने अनेक इच्छुक उमेदवार आपली ताकद आजमावून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये शिरूर तालुक्यातील पुर्व भागातील एक माजी सनदी आधिकारी रिंगणात ऊतरण्याची जोरदार तयारी करत आहे.
घोडगंगा कारखाना बंद असल्यामुळे तेथील शेतकरी, कामगारवर्ग, अशोक पवार यांच्यावरील नाराज गट आपल्याकडे वळतील अशी आशा या आधिकाऱ्याला वाटत आहे. येत्या भविष्यकाळामध्ये विद्यमान आमदार साहेबांना त्यांच्याच भागातून आव्हान उभे राहणार असल्याची जोरदार चर्चा शिरूर तालुक्यात चांगलीच रंगली आहे.
सदर सनदी अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून लढण्यास इच्छुक आहे. तर खुद्द अजित पवार हे अशोक पवार यांच्या विरोधात लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा शिरूर तालुक्यात चांगली रंगली आहे.
अजित पवार हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त रांजणगाव गणपती येथे दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी रांजणगाव ,शिरूर परिसरातील नागरिकांबरोबर वेळ घालवून समस्या जाणून घेऊन संवाद साधला आहे. एकुणच आगामी विधानसभा ही फारच अटीतटीची होणार असल्याची चर्चा शिरूर -हवेली मतदारसंघात होत आहे