राजगुरूनगर -नाशिक फाटा ते राजगुरुनगर सातपदरी (एलेवेटेड कॉरिडॉर) कामाची सुरुवात लवकरात लवकर व्हावी, जोपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येत नाही तोपर्यंत या मार्गावर सर्व सामान्यांकडून वाहनांसाठी टोल आकारण्यात येऊ नये. यासाठी रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीतील निवासस्थानी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे, वाहतूक कोंडी कृती समितीचे अध्यक्ष कुमार गोरे आदी सदस्यांनी भेट घेऊन मागणी केली.
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर नाशिक फाटा ते राजगुरूनगर या चौदा लेनच्या कामाची सुरुवात जलद गतीने व्हावी व वाहतूक कोंडीतून नागरिकांची लवकर सुटका व्हावी यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची वाहतूक कोंडी कृती समितीच्या सदस्यांनी दिल्लीत भेट घेतली. यावेळी दत्ताभाऊ चौधरी, मोबीन शेख, राम गोरे, सतीश गोरे, रिपाईचे हरीश देखने, दत्ता कांबळे यावेळी उपस्थित होते.
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडी संदर्भात काही दिवसांपूर्वी याबाबत चाकण येथे आंदोलन झाले होते. त्यानंतर चाकण व्यापारी व कृती समितीने पुणे दौऱ्यावर असलेल्या नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यावेळी निविदा प्रक्रिया तातडीने राबवण्यात येण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले होते.
त्यामुळे सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेऊन याबाबत दिलीप मेदगे व समितीच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली. चाकण तळेगाव शिक्रापूर याही कामाला गती द्यावी. तसेच मंजूर झालेल्या राजगुरुनगर-भीमाशंकर रस्त्याला तातडीने निधी उपलब्ध करून काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी दिलीप मेदगे यांनी केली.