दुर्गम भागातील झेडपीच्या शाळांची स्थिती
पुणे – वेल्हे तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन प्राथमिक शाळेत प्रत्येकी एक-एक विद्यार्थी, या दोन शाळांसाठी तीन शिक्षक आणि दोन्हीही विद्यार्थी एकाच गावचे, असे चित्र आढळून आले. एकाच गावातील रहिवासी असलेले दोन विद्यार्थ्यांपकी एक विद्यार्थी गावच्या शाळेत, तर दुसरा विद्यार्थी पाच किलोमीटर असलेल्या शाळेत शिक्षण घेत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गावातील एका विद्यार्थ्यास स्वत: शिक्षकच शाळेत ने-आण करत असल्याचे चित्र समोर आले.
पानशेत खोऱ्यातील आंबेगाव बुद्रुक येथील प्राथमिक शाळेत एक, तर पाच किलोमीटर अंतरावर घिवशी येथील शाळेत एक विद्यार्थी पटसंख्या आहे. दोन्ही विद्यार्थी एकाच गावचे आहेत. मात्र एक विद्यार्थी त्यांच्या गावातील शाळेत, तर दुसरा घिवशी येथील शाळेत शिकत आहे. आंबेगाव बुद्रक येथे दोन शिक्षक, तर घिवशी येथील शाळेत एक शिक्षक कार्यरत आहे.
या दोन्ही शाळांतील शिक्षकांची नोकरी प्रत्यक्षदर्शी सुरक्षित आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी काही शाळांना अचानक भेटी दिल्या. त्यामध्ये शाळा सुरू ठेवण्यासाठी शिक्षकांनी केलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
कारवाई कोणत्या नियमानुसार होणार?
शिक्षण विभागाच्या नियमानुसार एक विद्यार्थी शाळेत असला, तरी दोन शिक्षक असणे आवश्यक आहे. त्याच नियमाचा आधार घेतल्यास आंबेगाव बुद्रुक व घिवशी येथील शाळांत प्रत्येक एक विद्यार्थी आहेत. दोन्ही विद्यार्थी एकाच गावचे आहेत, हा मुद्दा गौण आहे. त्यामुळे कोणत्या नियमानुसार कारवाई करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस
शिक्षणाधिकाऱ्यांच्या अचानक भेटीतून हा प्रकार समोर आला आहे. ही बाब संबंधित केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांना माहिती असणे साहजिकच आहे. त्यामुळे याप्रकरणी संबंधित केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून खुलासा मागविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.